पणजी : रेंट अ बाईक व रेंट अ कारची राज्यात संख्या वाढत आहे. पर्यटकही वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असल्याने वाढत्या अपघातांची गंभीर दखल सरकारने घेतली आहे. सदर वाहने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याने शेवटी सरकारने या वाढलेल्या अपघातांची गंभीर दखल घेऊन रेंट अ बाईक व रेंट अ कारचे परवाने बंद केले आहेत.
याबाबत वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो म्हणाले, पर्यटकांच्या सोयीसाठी व गोवेकरांना रोजगार मिळावा यासाठी वाहतूक खात्याने रेंट अ बाईक व रेंट अ कार परवाने दिले होते. पर्यटक ही वाहने भाड्याने घेऊन स्वतः चालवतात; मात्र काही पर्यटक वाहतूक नियमांचे उल्लंघन करून ही वाहने चालवून अपघात घडवत असल्याचे विविध अपघातांच्या घटनांवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे वाहतूक खात्याने यांच्यासाठी नवीन परवाने देणे बंद करण्याचे ठरवले आहे, असे मंत्री गुदिन्हो म्हणाले.
महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी रेंट अ बाईक व रेंट अ कारमुळे पर्यटक टॅक्सींना भाडी मिळत नाहीत, त्यामुळे रेंट वाहने बंद करणे योग्य ठरेल, असे विधान दोन दिवसांपूर्वी केले होते. याचीही दखल सरकारने घेतली आहे. गोव्यात येणारे हजारो पर्यटक दिवसाच्या भाडेपट्टीवर ही वाहने घेतात. दोघेजण असतील तर ते दुचाकी घेतात. तीन ते चार पर्यटक असल्यास रेंट अ कार घेऊन पर्यटक फिरतात. या वाहनामुळे हवे तेथे जाणे त्यांना शक्य होते म्हणून या वाहनांना मागणी वाढू लागली आणि वाहतूक खात्याने परवाने देणे चालूच ठेवले होते. त्यामुळे रिक्षा व टॅक्सींची भाडी कमी झाली.
रेंट अ बाईक भाड्याने उपलब्ध करणारे काही व्यवसायिक रस्ता कर व इतर कागदपत्रे एकाच स्कूटरची वापरून त्याच्या माध्यमातून दोन-दोन स्कूटर भाड्याला देत असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. त्यासाठी दोन स्कूटरना समान क्रमांक दिला जातो.
पणजी, म्हापसा यासारख्या भागांत पार्किंगची समस्या असलेल्या शहरात रेंट अ बाईक व रेंट अ कार वाहने मिळेल तिथे पार्किंग केली जातात व ती पार्किंगची जागा अडवतात. त्यामुळे म्हापसा पोलिसांनी बुधवारी या वाहनचालकांना जाहीरपणे कळवले आहे की, या वाहनांसाठी ज्या जागा नक्की केल्या आहेत, तिथेच ती वाहने पार्किंग करावी न पेक्षा कारवाई केली जाईल. वाहतूक पोलिसांनी मिनी लाऊडस्पिकरचा वापर करून ही सूचना केली.