पणजी : जगातील विविध शहरांमध्ये लोकांना एकत्र येण्याचे जसे स्क्वेअर तथा चौक असतात त्याच धर्तीवर गोव्यातील पर्वरी येथे ‘टाऊन स्क्वेअर’ उभारला जाणार आहे. 120.97 कोटी रुपये खर्चून 11 हजार चौरस मीटरमध्ये पर्वरी टाऊन स्क्वेअर उभारला जाणार आहे. यामध्ये 35.34 कोटी रुपये निधी राज्याचा व उर्वरित सर्व निधी केंद्र सरकारचा असेल. हा प्रकल्प मार्च 2026 पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी दिली.
पणजी येथे गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पर्यटन संचालक केदार नाईक व गोवा पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक कुलदीप आरोलकर उपस्थित होते.
मंत्री खंवटे म्हणाले, मंत्रिमंडळाने या प्रकल्पाला मान्यता दिली आहे. या प्रकल्पासह फोंडा येथे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय उभारले जाणार आहे. त्याचे काम नंतर सुरू होईल. दोन्ही प्रकल्प स्वदेश दर्शन योजनेंतर्गत मंजूर झाले आहेत. टाऊन स्क्वेअरमध्ये दुकाने, संगीत कारंजे, लघू थिएटर, वारसा दालन, अशोक स्तंभ आदींचा समावेश असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सहकार्यामुळे स्वदेश दर्शन अंतर्गत गोव्याला 400 कोटींचा निधी उपलब्ध झाल्याचे ते म्हणाले.
मिरामार प्रकल्पातून मिळणार महसूल मिरामार येथे पर्यटन महामंडळाच्या जागेत पीपीपी तत्त्वावर पंचतारांकित हॉटेल बांधले जाणार आहे. सरकार मोठे हॉटेल बांधू शकत नाही म्हणून ते पीपीपी तत्त्वावर बांधले जात आहे. त्यातून पर्यटन महामंडळाला बराच महसूल मिळेल. असे उत्तर खंवटे यांनी या विषयावरील प्रश्नावर बोलताना दिले.
केंद्र सरकारने स्वदेश दर्शन योजनेंंतर्गत 400 कोटी रुपयांचे प्रकल्प मंजूर केले आहेत. पर्वरी ते हरवळे सर्कीट तयार करून विविध झर्यांचा विकास केला जाणार आहे. यात 4.50 कोटी खर्च करून पोंबुर्पा झरीचा विकास होणार आहे. तसेच कोस्टल सर्किट अंतर्गत कोलवा किनारी भागाचा विकास केला जाणार असल्याचे मंत्री खंवटे यांनी सांगितले.