पणजी : राज्यात देशी-विदेशी पर्यटकांची गर्दी वाढत असून अंतर्गत पर्यटन जागी व संध्याकाळी समुद्र किनार्यावर देशी पर्यटकांची मोठी गर्दी दिसत आहे. आठवड्याच्या शेवटी शनिवारी व रविवारी ही गर्दी वाढताना दिसते.
लहान आणि मध्यम हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले आहे की, त्यांना फक्त आठवड्याच्या शेवटी पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे. बूकिंग फूल्ल आहे. मात्र, आठवड्याचे सर्वच दिवस हॉटेल्स भरलेली नसतात. देशी पर्यटक ठराविक रक्कम घेऊन गोव्यात येतात. ते पैसे संपले की परत जातात, असे एक हॉटेल व्यावसायिकाने सांगितले. राज्यात सध्या पार्ट्यांचा हंगाम सुरू झाला आहे. मात्र, आवाजाच्या निर्बंधांमुळे संगीत पार्ट्या आयोजनवर अनेक बंधणे आल्याने पर्यटकांच्या संख्येवर परिणाम झाला आहे, असेही ते म्हणाले. गोवा लघु आणि मध्यम हॉटेलियर्स असोसिएशनचे अध्यक्ष संतोष दिवकर म्हणाले, आवाजावर निर्बंध घातल्यामुळे संगीत नृत्य कार्यक्रम घटले आहेत. त्याचा परिणाम किनारी भागात दिसून येत आहेत.
पंचतारांकित रिसॉर्टमध्ये गर्दी...
हॉटेल व्यावसायिक सेराफिनो कोता म्हणाले की, 2024 च्या हंगामाच्या तुलनेत दक्षिण गोव्यात लहान हॉटेल्समध्ये प्रवाशांच्या संख्येत थोडीशी सुधारणा दिसून येत आहे. आम्ही वर्षाच्या अखेरीस आशावादी आहोत, असे ते म्हणाले. लग्नसराईच्या हंगामामुळे पंचतारांकित रिसॉर्ट्समध्ये चांगली गर्दी दिसून येत आहे. यावर्षी हॉटेल्सनी लग्नाच्या पॅकेजचे दर कमी केले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
पर्यटकांच्या संख्येत 6.23 टक्क्यांनी वाढ...
राज्यात यावर्षी जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत एकूण पर्यटकांच्या संख्येत 6.23 टक्के वाढ झाली आहे. देशांतर्गत येणार्या पर्यटकांची संख्या 5.36 टक्क्यांनी वाढली असून 2024 मध्ये ही संख्या 69.24 लाख होती. ती 2024 मध्ये 72.96 लाखांपर्यंत पोहोचली आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या 2.59 लाखांवरून 3.36 लाखांपर्यंत वाढली, अशी माहिती पर्यटन अधिकार्याने दिली.