मडगाव : 'त्या' वादग्रस्त ऑनलाईन सेवेसाठी इर्पेला पेटलेले सावर्डे मतदारसंघाचे आमदार गणेश गावकर यांनी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या माध्यमातून मांडलेला प्रस्ताव दूधसागर टूर्स ऑपरेटर्स संघटनेने फेटाळून लावला आहे. दूधसागर पर्यटन व्यवसायाचे भागधारक या नात्याने जे काही शुल्क असेल ते भरण्यास आम्ही तयार आहोत; पण विविध शुल्काच्या नावावर पर्यटकांकडून भरमसाठ पैसे आकारणारा पर्यटन विकास महामंडळाचा 'तो' काऊंटर आणि ती वादग्रस्त ऑनलाईन सेवा तत्काळ रद्द करण्यासह संघटनेची जुनी ऑनलाईन सेवा सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांनी आम्हाला परवानगी द्यावी, असे सामूहिक गा-हाणे घालत कुळेतील जीप मालकांनी रविवारी दूधसागर आजोबा देवाला नारळ वाहिला.
दूधसागर धबधब्यावर पर्यटकांनाने आण करणाऱ्या जीपगाड्यांसाठी पर्यटन विकास महामंडळाने एक खासगी ऑनलाईन सेवा लागू केली आहे. भरमसाठ शुल्कामुळे पर्यटकांनी दूधसागराकडे पाठ केल्याचे जीप मालकांचे म्हणणे आहे. त्या ऑनलाईन सेवेतून ८ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला जात आहे. कुळे भागातील ४३१ कुटुंबे जीप व्यवसायावर अवलंबून आहेत. पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष या नात्याने ती ऑनलाईन सेवा इथे कायमस्वरूपी लागू करण्याच्या प्रयत्नात असलेले आमदार गणेश गावकर यांनी जीप मालक त्यांना वाद देत नसल्याचे पाहून हा विषय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे नेला होता. मुख्यमंत्र्यांनी १०० रुपयांची कपात दर्शवणाऱ्या सुधारित शुल्काचा प्रस्ताव जीप मालकांपुढे ठेवला होता. त्या अनुषंगाने रविवारी कुळेतील जीप मालकांनी रविवारी दूधसागर काऊंटर जवळ एकत्रित येऊन गावकऱ्यांच्या हस्ते नारळ वाहून दूधसागर देवाला सामूहिक गा-हाणे घातले. दूधसागर दूर मालक संघटनेचे अध्यक्ष नीलेश वेळीप आणि इतर जीपमालक उपस्थित होते.
गोवा पर्यटन महामंडळाचा तो काऊंटर काढून टाकावा, असा प्रस्ताव आम्ही सावडे भाजपा मंडळाचे अध्यक्ष विलास देसाई यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली असून त्यांनी ती मान्य करावी. यासाठी दूधसागर आजोबा देवस्थानाला गा-हाणे घालण्यात आल्याचे अध्यक्ष नीलेश वेळीप यांनी सांगितले.