दोडामार्ग : तालुक्यातील जंगलात दिसलेली वाघीण. Pudhari File Photo
गोवा

दोडामार्ग जंगलात वाघिणीचा वावर

पश्चिम घाटाच्या पर्यावरणीय समृद्धतेवर मोहर

पुढारी वृत्तसेवा
प्रभाकर धुरी

पणजी : दोडामार्ग तालुक्यातील सह्याद्रीच्या जंगलात वाघिण दिसली आणि पश्चिम घाटाच्या पर्यावरणीय समृद्धतेवर पुन्हा एकदा मोहर उमटली. पश्चिम घाटातील गोव्यातील विर्डीपासून आंबोलीपर्यंतचा भाग हा वाघांचा अधिवासाचा प्रदेश (कॉरिडॉर) आहे. आंबोलीमध्ये तर ब्लॅक पँथरही आढळला आहे. त्यामुळे पर्यावरण संवेदनशील असलेल्या या भागातील दुर्मिळ वाघांना वाचवण्यासाठी शासन आणि स्थानिकांनी प्रयत्न करायला हवे. जगभरात वाघांची संख्या घटत असताना गोवा आणि सिंधुदुर्गच्या सीमेवर वाघांच्या संख्येत वाढ होत आहे ही पर्यावरण प्रेमींसाठी दिलासादायक बाब आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग, आंबोली या सह्याद्रीच्या पट्ट्यात वाघांचे अस्तित्व गेल्या अनेक वर्षांपासून आहे. गोवाही त्याला अपवाद नाही. गोव्यातील विर्डी परिसरात कॅमेर्‍यात दिसलेली वाघीण आणि पिल्ले आणि त्यानंतर त्यांचे आढळलेले मृतदेह ही चटका लावणारी गोष्ट होती. अलीकडेच सावंतवाडी तालुक्यातील दाभिल येथील पांडवकालीन जलकुंडात एका वाघिणीचा मृतदेह आढळला आणि खळबळ उडाली होती. एकीकडे वाघिणीच्या अनैसर्गिक मृत्यूची घटना घडली असताना दुसरीकडे एका वाघिणीचा वावर आढळणे दिलासादायक आहे. दोडामार्ग तालुक्यातील जंगल भागात भ्रमंती करणार्‍यांना दोन दिवसांपूर्वी ही वाघीण दिसली. परतीच्या प्रवासात असताना रस्ता ओलांडताना ही वाघीण अचानक कारसमोर आली आणि थेट झाडीत घुसली. मात्र, या पर्यावरण प्रेमींनी या वाघिणीचे मनासारखे चित्रिकरण केले. तिनेही ते क्षण संयमाने हाताळले, अजिबात आक्रस्ताळेपणा केला नाही किंवा आक्रमक होऊन डरकाळी फोडली नाही. तिच्या कॅमेर्‍यात कैद झालेल्या अदा समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्या आणि वाघाचे अस्तित्व पुन्हा एकदा ठळक झाले.

मालवण येथील दर्शन वेंगुर्लेकर यांची यूथ बीटसची टीम नेहमीप्रमाणे जंगल भ्रमंतीसाठी दोडामार्ग तालुक्यात आली होती. ही टीम दिवसभर भ्रमंती करून मालवणकडे परतत असताना तालुक्यातील घनदाट जंगलात त्यांना गाडीसमोरून वाघ रस्ता ओलांडताना दिसला. त्यांनी त्याचे चित्रीकरण केले.

गोव्यात 5 वाघ; चौघांचा मृत्यू

2022 च्या व्याघ्र गणनेनुसार, गोव्यात अंदाजे 5 वाघ आहेत.पण , तत्पूर्वी जानेवारी 2020 मध्ये एका वाघिणीचा आणि तिच्या तीन बछड्यांचा अभयारण्यात विषबाधेमुळे मृत्यू झाला होता. म्हादई वन्यजीव अभयारण्य उत्तर गोव्याच्या सत्तरी तालुक्यात 208.5 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले आहे. गोवा सरकार मात्र म्हादई वन्यजीव अभयारण्याला व्याघ्र अभयारण्य म्हणून दर्जा देण्यास टाळाटाळ करत असल्याचे चित्र आहे.

अस्तित्व नाकारण्याचा प्रकार

पर्यावरणाचा र्‍हास करून खनिज प्रकल्प ,विकास प्रकल्प अथवा निवासी संकुले उभी करायची असतात, तिथली प्रशासकीय यंत्रणा आणि त्या त्या राज्याचे सरकार वाघाचे अस्तित्व मान्य करायला बघत नाहीत, हा कटू अनुभव आहे.मात्र, जल,जंगल जमीन आणि वाघ,हत्ती यासारखे प्राणी वाचायला हवेत.त्यासाठी लोकलढ्याची गरज आहे,असे मत वनश्री फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय सावंत यांनी व्यक्त केले.

गणनेनुसार महाराष्ट्रात 444 वाघ

2022 च्या व्याघ्र गणनेनुसार, महाराष्ट्रात 444 वाघ आहेत.2006 मध्ये महाराष्ट्रात 103 वाघ होते, तर 2010 मध्ये 168 वाघ होते. राज्यात सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. सध्या महाराष्ट्रातील व्याघ्रप्रकल्पांमध्ये एकूण 190 वाघ आहेत.

सह्याद्रीच्या पट्ट्यात वाघांच्या संख्येत वाढ

दोडामार्ग, आंबोली ह्या सह्याद्रीच्या पट्ट्यात वाघांच्या संख्येत वाढ होत आहे. या परिसरात दोन ते तीन वर्षांपूर्वी चारवर असलेली वाघांची संख्या आता आठवर पोहोचली आहे. एका वर्षापूर्वी खडपडे येथील जंगल क्षेत्रात काही ग्रामस्थांना एक वाघीण पाण्यासाठी नदी क्षेत्रात आली असल्याचे दिसून आले होते. त्याचे फोटोही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. तर तिळारी परिसरात वन्यप्राण्यांच्या हालचाली टिपण्यासाठी लावलेल्या कॅमेर्‍यातही वाघांचा वावर कैद झाला होता. दरम्यान, वाघीण दिसलेले खडपडेतील क्षेत्र वन विभागाने संरक्षित केले होते. याच वाघिणीचे भ्रमण आंबोली परिसरात सुरू असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT