पणजी : साकोर्डा येथे मृतावस्थेत आढळलेल्या वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, विश्वजित राणे तरी त्याची शिकार वा हत्या झालेली नाही, असा दावा वनमंत्री विश्वजित राणे यांनी केला. सांगाड्याचे नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, त्याच्या अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असेही राणे म्हणाले.
इतके दिवस सरकार आणि मंत्री गोव्यात वाघ नाही म्हणत होते. प्रत्यक्षात २००९ पासून २०२६ पर्यंत गोव्यातील ६ वाघांचा मृत्यू झाला आहे. त्यातील ५ वाघांची फास लावून व विष घालून हत्या केल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर आता मिळालेल्या वाघाचा मृतदेह सडलेला आढळला. त्यामुळे त्याचे विच्छेदन करणे अशक्य होते.
तथापि, कुठल्याही प्रकारचा अहवाल न येता वनाधिकाऱ्यांने वाघाचा मृत्यू नैसर्गिक असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. गोव्यातील म्हादई अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळू नये यासाठी उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. स्थानिकांचा व्याघ्र प्रकल्पाला विरोध आहे. त्यामुळे सरकार आणि मंत्री त्यांच्या बाजूने आहेत
अद्याप फॉरेन्सिक अहवाल प्राप्त नाही
समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनीही आमचा वाघाला विरोध नाही, तर व्याघ्र प्रकल्पाला आहे, असे म्हटले आहे. एकूण काय, तर आता वनमंत्री राणे यांनी वाघाची हत्या किंवा शिकार झाली नसल्याचे सांगितले आहे. मात्र, अद्याप फॉरेन्सिक अहवाल आला नसल्याची पुस्तीही जोडली आहे.