Three accidents in South Goa
मोले आणि सुकतळे येथे झालेल्या तीन अपघातांत तिघे ठार झाले.  Pudhari News Network
गोवा

काळरात्र : दक्षिण गोव्यात वेगवेगळ्या ३ अपघातांत तिघे ठार

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : दक्षिण गोव्यासाठी सोमवारची रात्र काळरात्र ठरली. लोटली, मोले आणि धारबांदोडा महामार्गावरील सुकतळे येथे झालेल्या तीन अपघातांत तिघे ठार झाले. सुकतळी येथे महामार्गावर निष्काळजीपणे उभा करण्यात आलेल्या नादुरुस्त ट्रकला दुचाकीची धडक बसल्याने तन्वेश रिवणकर (वय 31, रा. कुळे) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संतापलेल्या जमावाने त्या ट्रकवर हल्ला करत अडीच तास महामार्ग रोखून धरल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली. पोलिसांनी ट्रक चालकावर कारवाईचे आश्वासन दिल्यामुळे जमाव शांत झाला.

सुकतळी येथील अपघातात मृत्यू पावलेला तन्वेश रिवणकर हा कुळे येथील राहणारा आहे. त्याचे वडील हे निवृत्त शिक्षक असून आई निवृत्त हेडमास्तर आहेत. तन्वेश याला एक विवाहित बहीण आहे. त्याच्या अपघाती मृत्यूमुळे आई-वडिलांचा एकुलता एक आधार हरपला आहे. तन्वेश याची दूधसागर धबधब्यावर प्रवाशांना ने-आण करणारी जीप आहे. सध्या दूधसागर धबधबा पावसामुळे बंद ठेवण्यात आला आहे. जीपचा व्यवसाय बंद असल्याने तो वाघातोर येथे तात्पुरत्या कामाला जात होता.

सोमवारी रात्री उशिरा तो दुचाकीने कामावर निघाला होता. सुकतळी येथे गेल्या तीन दिवसांपासून बंद पडल्याने पार्क करून ठेवण्यात आलेल्या कर्नाटक नोंदणीकृत ट्रकचा त्याला अंधारामुळे अंदाज आला नाही. समोरून गाडी येत असल्याने त्याने आपली दुचाकी बाजूला घेण्याच्या प्रयत्नात त्याच्या दुचाकीची ट्रकला धडक बसली. या धडकेत तो जागीच ठार झाला.तन्वेश याच्या अपघाताचे वृत्त कुळेत पसरताच मोठ्या प्रमाणावर लोक सुकतळे येथे जमा झाले. ट्रकचा चालक आणि क्लिनर पसार झाले.

ट्रकची मोडतोड करत संतप्त जमावाने महामार्ग रोखून धरला.

असूनही पोलिस काहीच करत नसल्याचा आरोप जमावाने केला. ट्रकची मोडतोड करत संतप्त जमावाने महामार्ग रोखून धरला. त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. महामार्गावर विजेची सोय नाही. वाहतूक पोलिस केवळ लोकांना चलन देण्याचे काम करतात, असा आरोप जमावाने केला. तन्वेशच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या त्या ट्रकचे गेल्या तीन दिवसांपासून दुरुस्तीचे काम सुरू होते. अंधारात त्या ट्रकचा अंदाज येत नव्हता. दुसर्‍या वाहनांना सतर्क करण्यासाठी कोणतीही निशाण तिथे लावण्यात आले नव्हते, अशी माहिती तन्वेशचा मित्र अंकित गांजेकर यांनी दिली. कुळे पोलिसांनी करवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तणाव शांत झाला. पंचनामा केल्यानंतर तन्वेश याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. सायंकाळी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

फातोर्डा येथे दुचाकी घसरून तरुण ठार

फातोर्डा येथील बोलशे सर्कलकडून रावबनफोंडकडे जाणार्‍या रस्त्यावर संध्याकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास दुचाकी घसरुन अपघात घडला. रस्त्यावरील छोट्या दगडांवरुन दुचाकी स्लीप झाली व दुचाकीचालक अल्विन फर्नांडिस हा ठार झाला. त्याला इस्पितळात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याला मृत घोषित केले. पोलिस निरीक्षक नाथन आल्मेदा यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

लोटलीत हीट अण्ड रन, पादचारी ठार

लोटली येथे मध्यरात्रीनंतर एका मोठ्या वाहनाने रस्त्याबाजूने जाणार्‍या पादचार्‍याला ठोकरुन पलायन केले. यात पादचारी ठार झाला असून मायना कुडतरी पोलीस वाहनाचा शोध घेत असून मृताची ओळखही पटलेली नाही.

वेर्णा औद्योगिक वसाहतीकडून रायच्या दिशेने येणार्‍या महामार्गावर लोटली येथे मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अवजड वाहनाचे पादचार्‍याला चिरडले. अपघातानंतर वेर्णा अग्निशामक दलाच्या जवानांनी रस्त्यावर पाणी मारुन रक्ताचा सडा धुऊन काढला. या अपघातातील मृत हा बेघर असल्याचा अंदाज असून त्याची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. याशिवाय रस्त्यावरील टायर्सच्या खुणांवरुन सदर वाहन ट्रक असावा अंदाज आहे. या मार्गावरील वाहतूक केलेल्या वाहनांची माहिती घेत अपघात केलेल्या वाहनाचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली मायना कुडतरी पोलीस पुढील तपास करत आहेत.

SCROLL FOR NEXT