पणजी : पुढारी वृत्तसेवा
पर्वरी येथील हॉटेल लिओ मॅजेस्टिक कॅसिनोचे संचालक श्रीनिवास नायक यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणाचा छडा लावण्यात गोवा पोलिसांच्या क्राईम ब्राँचला यश आले आहे. या प्रकरणात संशयित तीन संशयितांना उत्तर प्रदेश व मुंबईतून अटक करण्यात आली असून, हल्ल्यामागील कारणांचा शोध घेण्यासाठी कसून चौकशी सुरू आहे. मात्र, मुख्य शूर्टस फरार आहेत.
क्राईम ब्राँचने अटक केलेल्यांमध्ये काझी शेख (वय २८) हा वाजीनगर, गोवंडी, मुंबई येथील रहिवासी असून, त्याला उत्तर प्रदेशातील जौनपूर पोलिसांच्या मदतीने उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली. इसरार अली (२५) हा तेलियानपुरवा, बुलबुल नवाज, बहराईच, उत्तर प्रदेश येथील रहिवासी त्याला मुंबईतून ताब्यात घेण्यात आले.
सूरज उपेंद्र आचार्य (३६) हा बोरिवली पूर्व, मुंबई येथील रहिवासी त्यालाही मुंबईतून ताब्यात घेण्यात आले. गेल्या २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी श्रीनिवास नायक हे हॉटेल लिओ मॅजेस्टिकमधून घरी जाण्यासाठी निघाले असताना दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर पिस्तुलातून तीन गोळ्या झाडल्या. मात्र, नायक या हल्ल्यातून बचावले.
गोळीबारानंतर हल्लेखोर महामार्गाच्या दिशेने पसार झाले होते. यावेळी नायक यांच्यासोबत असलेल्या अंगरक्षकाने त्यांच्या सुरक्षेसाठी प्रत्युत्तरादाखल तीन गोळ्या झाडल्या.हॉटेलच्या लॉबीमध्ये झालेल्या या गोळीबारामुळे येथील पर्यटक तसेच कर्मचारी यांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला होता.
या घटनेप्रकरणी पर्वरी पोलिसांनी २८ ऑगस्ट रोजी गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर क्राईम ब्राँचच्या पथकाने उत्तर गोवा जिल्ह्यातील पोलिस पथकांच्या सहकार्याने हॉटेल तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यासोबत तांत्रिक विश्लेषण, घटनास्थळी उपस्थित असलेल्या तक्रारदार, त्यांचा अंगरक्षक आणि अन्य साक्षीदारांची चौकशी करण्यात आली.
साक्षीदारांचे जबाब, सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि तपासातून मिळालेल्या अन्य पुराव्यांशी पडताळण्यात आले. या तपासाच्या आधारे पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांना अटक केली.
अटक केलेल्या तिघांची चौकशी सुरू असून यातील काझी शेख याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. उर्वरित दोघा संशयितांना शुक्रवार दि. ११ रोजी म्हापसा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.