म्हापसा : सार्वजनिक स्मशानभूमीसाठी संपादित केलेल्या कुचेली कोमुनिदाद जागेतील जमिनीचे भूखंड पाडून ते कायदेशीररीत्या नावावर करून देतो, असे सांगून तक्रारदाराची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी राजा अँथनी, सुमित फडते व राजू मांद्रेकर या तिघा संशयितांना अटक केली आहे.
मागील वर्षी घडलेल्या फसवणुकीच्या या प्रकरणाची तक्रार कुचेली येथील रिकी झा व इतरांनी म्हापसा पोलिस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. काही महिन्यांपूर्वी याच जागेतील अतिक्रमण करून बांधण्यात आलेली बेकायदा छत्तीस बांधकामे सरकारने जमिनदोस्त केली होती. अटक केलेल्या संशयितांनी या जमिनीतील तक्रारदाराला 270 चौरस मीटर जागा विकली होती. या बदल्यात त्यांच्याकडून नऊ लाख 75 हजार रुपये घेतले होते.
पैसे घेऊनही ही जागा तक्रारदार रिकी झा याच्या नावावर करून दिली नाही. संशयितांनी जागेचे हक्क तक्रारदाराच्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी कागदोपत्री औपचारिकता पूर्ण केली जातील, असे वचन दिले होते. मात्र फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधितांनी म्हापसा पोलिसात दिली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करून अटक केली आहे.