the kerala story 2  
गोवा

IFFI The kerala story 2|लव्ह जिहाद, आंधळे प्रेम अन् सत्य परिस्थितीचे विदारक चित्रण : 'द केरला स्टोरी २'

THE KERALA 2 STORY- लव्ह जिहाद, आंधळे प्रेम अन् सत्य परिस्थितीचे विदारक चित्रण : 'द केरला स्टोरी २'

पुढारी वृत्तसेवा

पणजी : विठ्ठल गावडे पारवाडकर

देशात नाव बदलून हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून नंतर त्यांचे धर्मांतर करणे, त्यांच्यावर अत्याचार करणे, त्यांची परदेशात विक्री करणे ही प्रकरणे लव्ह जिहादच्या नावाखाली घडत आहेत. यात सर्वात जास्त केरळमधील मुली फसत असल्याचे राष्ट्रिय महिला आयोगाचा अहवाल सांगतो. याच विषयावरील 'द केरला स्टोरी-२' हा हिंदी चित्रपट शुक्रवारी इफ्फीत दाखवण्यात आला. यापूर्वी द केरला स्टोरी भाग १ आला होता. आता हा दुसरा भाग.

या चित्रपटात केरळ, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये, तीन तरुणी कुटुंब, स्थैर्य आणि परंपरांपेक्षा प्रेमाला प्राधान्य देतात, पण नंतर त्यांना त्यांच्या निवडीची छुपी किंमत कळते. सुरेखा, एक महत्त्वाकांक्षी नागरी सेवा उमेदवार, नेहा, एक राष्ट्रीय स्तरावरील भालाफेकपटू, आणि दिव्या एक महत्त्वाकांक्षी सोशल मीडिया स्टार, या तिघींचाही विश्वास असतो की प्रेम स्वातंत्र्य आणि एक चांगले भविष्य घेऊन येईल.

म्हणून त्या लव्ह जिहादच्या योजनेत सहभागी झालेल्या तरुणांच्या प्रेमाच्या जाळ्यात फसतात व आई-वडीलांना सोडून जातात आणि फसतात. त्याच्यावर प्रेम करणाऱ्या मुस्लीम तरुणांचे खरे रुप जेव्हा त्यांना कळते. त्यावेळी बराच वेळ झालेला असतो. त्या स्वतःला हेराफेरी, नियंत्रण आणि विश्वासघातावर आधारित नात्यांमध्ये अडकलेल्या पाहतात. जसजसे त्यांचे आयुष्य समांतरपणे उलगडत जाते.

तसतसा त्यांचा प्रवास हे उघड करतो की उत्कटता कशी वर्चस्वाचे साधन बनू शकते, स्वप्नांना शांततेत आणि स्वातंत्र्याला कैदेत बदलू शकते. द केरला स्टोरी -२ हे एक भावनिक, बहुआयामी नाट्य असून ते या तीन कथांना प्रेम, भ्रम आणि त्यागाच्या एका प्रभावी चित्रात गुंफते. या चित्रपटाचे दिग्दर्शक कामाख्या नारायण सिंह असून ते भारतीय चित्रपट निर्माते आणि लेखक आहेत, ज्यांचे कार्य सामाजिकदृष्ट्या समर्पक आणि व्यक्तिरेखा-प्रधान कथांवर केंद्रित आहे. त्यांचे चित्रपट वास्तववादावर आधारित भावनिकदृष्ट्या गुंतवून ठेवणाऱ्या कथानकांच्या माध्यमातून समकालीन समस्यांचा शोध घेतात.

द केरला स्टोरी २ पूर्वी डेमोग्राफी इज डेस्टिनी हा लघुपट दाखवण्यात आला. चित्रपटाची सुरुवात ऐतिहासिक जनगणनेच्या आकडेवारीने होते, ज्यात १९ व्या शतकाच्या अखेरीपासून ते आजपर्यंत भारताच्या लोकसंख्येच्या रचनेत झालेले बदल अधोरेखित केले आहेत आणि अशा बदलांनी फाळणीसारख्या मोठ्या घटनांवर कसा प्रभाव टाकला आहे, याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. स्वातंत्र्यावेळी भारतात हिंदूची लोकसंख्या ८३ टक्के होती ती आता ६९ टक्के झाली आहे तर मुस्लीमांची लोकसंख्या ११ टक्क्यावरुन २९ टक्के झाली आहे. या उलट पाकिस्तानात हिंदू २५ टक्क्यावरुन २ टक्के झाली आहे. ही संख्या डेमोग्राफी बदलाचा गंभीर इशारा देते. असा संदेश दिग्दर्शक कामाख्या नारायण सिंह व अंशुमन शेखर यांनी दिला आहे.

केरला स्टोरी -२ द्वारे, ते प्रेम, स्वातंत्र्य, श्रद्धा आणि हेराफेरी यांच्यातील गुंतागुंतीच्या आंतरसंबंधांचे परीक्षण करतात आणि चिंतन व अर्थपूर्ण संवादाला प्रेरणा देणाऱ्या सिनेमाप्रती आपली वचनबद्धता कायम ठेवतात. द केरला स्टोरी - २ ही प्रेम, निवड आणि आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या अदृश्य शक्तींबद्दलची कथा आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना स्वातंत्र्य, विश्वास आणि... यावर चिंतन करण्यासाठी आमंत्रित करतो, असे सिंह यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT