हणजूण : गोव्यातील टॅक्सी व्यावसायिकांच्या न्याय्य हक्कांसाठी सतत आवाज उठवणारे टॅक्सी मालक संघटनेचे नेते योगेश गोवेकर यांना हणजूण पोलिसांनी हिस्ट्रीशीटर म्हणून नोंद केल्याच्या निषेधार्थ शेकडो टॅक्सी चालकांनी हणजूण पोलिस ठाण्यावर मोर्चा नेला.
गोवा सरकार कॅब अॅग्रिगेटरच्या माध्यमातून स्थानिक गोमंतकीय तरुणांच्या हातात असलेला टॅक्सी व्यवसायावर गदा आणू इच्छिते, हे आम्हाला कदापि मान्य नाही. आपण सदोदित अन्यायाविरुद्ध गोवा माईल्स किंवा इतर अॅपबेस टॅक्सी व्यवसायाविरुद्ध आवाज उठवलेला आहे व उठवत राहणार. सध्या सरकार नवीन नोटिफिकेशनद्वारे कॅब अॅग्रीकेटर सुरू करण्याचा प्रयत्न करीत आहे. तसे झाल्यास गोमंतकीय तरुणांच्या हातात असलेला हा एकमेव व्यवसाय खासगी कंपन्यांकडे जाईल. आपण या विरुद्ध आवाज उठवतो म्हणून सरकार आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचाच भाग म्हणून आपली हिस्ट्रीशीटर म्हणून नोंद करण्यात येत आहे. आपण कधीही खून, मारामार्या असे प्रकार केलेले नसताना आपणास हिस्ट्रीशीटर करणे कितपत योग्य आहे. आपला आवाज दाबण्यासाठी पुढे कदाचित आपणास तडीपारही करू शकतात किंवा आपला एन्काऊंटरही करण्यास सरकार मागे पुढे पाहणार नाही, असा आरोप योगेश गोवेकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला. यावेळी टॅक्सी मालक संघटनेच्या इतर पदाधिकार्यांनी तसेच काही टॅक्सी व्यावसायिकांनी योगेश गोवेकर यांना पाठिंबा देऊन सरकारच्या कृतीचा निषेध केला.
योगेश गोवेकर यांच्याविरुद्ध हणजूण पोलिस ठाण्यात 7 गुन्हे नोंद असून दोन गुन्हे कळंगुट पोलिस ठाण्यात नोंद आहेत. ज्यांच्या विरोधात जास्तीत जास्त गुन्हे नोंद आहेत, अशांची वरिष्ठांकडे यादी पाठवली जाते. या पोलिस ठाण्यातून पाठवलेल्या यादीतून पाच जणांची हिस्ट्रीशीटर म्हणून नोंद करण्यात आली आहे. यापूर्वी या पोलिस ठाण्यात 9 हिस्ट्रीशीटर्सची नोंद आहे. त्यात आणखी पाच जणांचा समावेश झाल्याची माहिती हणजूण पोलिस निरीक्षक सूरज गावस यांनी दिली.