म्हापसा : कॅब अॅग्रिगेटर धोरणाला विरोध करण्यासाठी कळंगुट व शिवोली मतदारसंघातील टॅक्सी व्यावसायिकांनी आमदार मायकल लोबो तसेच आमदार डिलायला लोबो यांच्या निवासस्थानी धडक देऊन लोबो दाम्पत्यास जाब विचारला. भविष्यात आमदारकी टिकवायची असेल तर त्यांनी टॅक्सी व्यावसायिकांना पाठिंबा द्यावा, असा थेट इशारा दिला. आमदारांनी आमच्या पाठीशी उभे राहावे, अशी मागणी केल्यामुळे चर्चेवेळी टॅक्सी चालक व आमदारांमध्ये खटके उडाले. यावेळी आमदार मायकल लोबोही संतप्त झाले. त्यांनी टॅक्सी व्यावसायिकांनी आपल्याशी शांतपणे चर्चा करावी, असे सांगितले.
यावेळी टॅक्सी व्यावसायिकांची बाजू मांडताना टॅक्सीचालक नेते योगेश गोवेकर म्हणाले, कॅब अॅग्रिगेटरला आमचा तीव्र विरोध आहे. मुळात अॅग्रिगेटर धोरण हे पारंपरिक टॅक्सीचालकांची उपजीविका संपविण्यासारखे आहे. कॅब अॅग्रिगेटर धोरण चालीस लागल्यास आमचे अस्तित्व संपेल. हा लढा जुना असून, आश्वासने ऐकून आम्ही आता थकलो आहोत. आता राजकीय कृती अपेक्षित आहे. या लढ्यात दोन्ही आमदारांनी आमच्या पाठिशी उभे रहावे. आमच्या उपजिवीकेवर कुणीही राजकारण करू नये, अन्यथा आगामी विधानसा निवडणुकीवेळी राजकारण काय असते हे आम्ही सर्वांना दाखवून देवू. त्यामुळे कुणीही आम्हाला गृहीत धरू नये. राहिला विषय, या प्रश्नावर तोडगा न काढल्यास आम्ही आमदारांच्या दारी येऊन भिक मागू, असा इशारा गोवेकर यांनी दिला.
दरम्यान, टॅक्सी व्यावसायिकांच्या सुरू असलेल्या चर्चेवेळी व्यावसायिकांनी दिलेल्या इशार्यामुळे मायकल लोबो व्यावसायिकांवर भडकले. शांतपणे चर्चा करण्याची सूचना त्यांना केली तसेच या वादावर तोडगा काढण्याचे तसेच हा व्यवसाय गोवेकरांच्या हातात कायम ठेवण्याचे आश्वासनही लोबो यांनी दिले. कॅब अॅग्रिकेटरला हरकत घेणारे पत्र सादर केले जाईल, असे आश्वासन आमदारांकडून देण्यात आल्याची माहिती टॅक्सी व्यावसायिकांनी दिली. तसेच तंत्रज्ञानाच्या नावाखाली आमचा व्यवसाय संकटात टाकू नका, असा इशाराही देण्यात आला. यावेळी टॅक्सी चालकांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यास अपयश आल्यास टॅक्सी व्यावसायिक बाप्पा यांनी आपल्या परिवाराला मायकल लोबो यांच्या दारात सोडण्याचा इशारा दिला, त्यांनी मुलांना नोकरी द्यावी, असेही ते म्हणाले.
पत्रकारांशी बोलताना आमदार मायकल लोबो म्हणाले, टॅक्सी व्यवसायाच्या व्यवहारात पारदर्शकता महत्त्वाची आहे. कारण पर्यटक परत जातेवेळी, ते चांगल्या आठवणींनी माघारी जावेत, अशी सरकारची भावना आहे. याविषयी मुख्यमंत्र्यांसोबत बैठकांची मालिका घेवू. कारण चर्चेतून तोडगा येईल. आम्ही पर्यटन क्षेत्रात कार्यरत आहोत, त्यामुळे ग्राहक या नात्याने पर्यटक काय बोलतात याची आम्हाला कल्पना आहे. यासाठी पारदर्शकता हवी.