डिचोली : पुढारी वृत्तसेवा
हरित व धवल क्रांतीचे स्वप्न बाळगून स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर गोवासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी समूह शेती योजनेला चालना देण्यासाठी घेतलेला प्रयत्न यश आले असून सुर्ला गावकरवाडा येथे अनेक वर्षे पडीक असलेल्या सुमारे १५ हेक्टर क्षेत्रात अंदाजे दीड लाख चौरस मीटर जागेत सुमारे ७० शेतकऱ्यांना संघटित करून समूह शेतीचा उपक्रम राबवण्यात आला आहे.
समूह शेती अंतर्गत आधुनिक पद्धतीने भात लागवडीस प्रारंभ करण्यात आलेला आहे. जिल्हा पंचायती अंतर्गत समूह शेती उपक्रम राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर सुर्ला गावकर बाडा येथील हा पहिला प्रयोग १०० टक्के यशस्वी होण्याची चिन्हे दिसू लागली असून सरकारने कृषी खाते अंतर्गत ९० टक्के सबसिडी तसेच संपूर्ण जमीन लागवडीखाली आणण्यासाठी यंत्रसामुग्री व इतर सुविधा पुरवल्या असून संपूर्ण शेतीला फैसिंग करण्याची योजना आहे अशी माहितीकृषी अधिकारी नीलिमा गावस तसेच साखळीचे कृषी अधिकारी पंकज पोकळे यांनी दिली.
कृषी संचालक संदीप फळदेसाई, जल संपदा अधिकारी कृषी अधिकारी स्थानिक शेतकरी प्रोग्रेसिव्ह फार्मर्स क्लब आदींनी या कार्यात विशेष योगदान दिले आहे. नवनिर्वाचित जिल्हा पंचायत सदस्य सुंदर नाईक यांनी सांगितले की, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा पंचायतीला मिळालेल्या शेतीच्या अधिकारांचा वापर करून, संपूर्ण डिचोली तालुक्यातील पडीक शेतजमीन पुन्हा एकदा लागवडीयोग्य बनवण्यासाठी प्रयत्न केले जातील. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, सुर्ला गावातील श्री देव नारायण मंदिरामागील गेल्या अनेक वर्षांपासून पडीक असलेली शेती पुन्हा लागवडीखाली आणण्यात आली आहे.
जलसंपदा विभाग, कृषी विभाग आणि डिचोली ग्रोग्रेस फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड यांच्या सहकायनि श्री देव नारायण शेतकरी संघटनेने आज हे काम सुरू केले आहे, असे सुंदर नाईक यांनी सांगितले. कृषी विभागाच्या अधिकारी नीलिमा गावस यांनी सामुदायिक शेती शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरत आहे यावर प्रकाश टाकला.
भविष्यात सामुदायिक शेतीवर अधिक भर देण्याचे आवाहन त्यांनी केले. यामुळे शेतीची उत्पादकता आणि उत्पन्नात लक्षणीय वाढ होऊ शकते. जलसंपदा खात्यातर्फे जमीन नीट करण्यासाठी सर्व सहकार्य करण्यात आले असून हा उपक्रम स्तुत्य असल्याचे विनोद् भंडारी यांनी सांगितले. विश्वंभर गावस यांनी समूह शेती खूप फायदेशीर ठरणारी असून सर्व ते सहकार्य डिचोली तालुका प्रोग्रेसीव संघटनेतर्फे देण्यात येईल, अशी हमी दिली.
हरित, धवल क्रांतीच्या दिशेने वाटचाल :
मुख्यमंत्री पडीक शेतजमिनी पुन्हा शेतीखाली आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, सुर्ला गावातील श्री देव नारायण मंदिराच्या मागील सहा वर्षांपासून पडीत असलेली शेतजमीन पुन्हा शेतीखाली आणण्यात आली आहे. समूह शेती अंतर्गत यापुढे अनेक उपक्रम राबवणे तसेच जिल्हा पंचायतीकडे ही जबाबदारी देताना अधिक जोमाने हरित व धवल क्रांतीसाठी योगदान देण्याचा आपला संकल्प असून, हा पहिला प्रयत्न स्तुत्य असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
शेती उत्पादकता, उत्पन्न वाढेल
कृषी विभागाच्या अधिकारी नीलिमा गावस यांनी सामूहिक शेतीचे फायदे सांगितले. त्यामुळे शेतीची उत्पादकता आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते, असे स्पष्ट केले. हा उपक्रम शाश्वत शेती पद्धती आणि जमिनीच्या संसाधनांचा कार्यक्षम वापर करण्यास प्रोत्साहन देईल असा विश्वास असल्याचे गावस यांनी सांगितले,
शेतकऱ्यांना लखपती करण्याच्या दृष्टीने अनेक उपाय सुरू आहेत. पडीक शेती समूह शेतीच्या माध्यमातून लागवडी खाली आणून आत्मनिर्भर गोव्याचा संकल्प सिद्धिस नेण्याचा सरकारचा प्रयत्न स्तुत्य आहे.यशवंत गावकर
राज्यात अनेक ठिकाणी कृषी संपन्नता यावी हा सरकारचा उद्देश असून, त्यासाठी सरकारतर्फे जलस्रोत खात्यामार्फत सर्व ते सहकार्य पुरवण्यात येत आहे.- सुभाष शिरोडकर, बलखीत मंत्री