पणजी : गोवा मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरांच्या बनावट नियुक्त्यांचे आमिष दाखवून १ लाख ९३ हजार ९६ रुपयांची सायबर फसवणूक केल्याच्या प्रकरणातील अमरावती (महाराष्ट्र) येथील २४ वर्षीय सुमित राजेश इंगोले याला म्हापसा प्रथमश्रेणी न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. पर्वरी पोलिसांनी त्याला अटक केली होती.
पोलिसांच्या तपासानुसार, जीएमसीमध्ये डॉक्टरांची नियुक्ती करून देण्याचे आश्वासन देत संबंधितांकडून पैसे उकळण्यात आल्याचा आरोप आहे. या माध्यमातून एकूण १,९३,०९६ रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. अटकेनंतर इंगोले याने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता.
सुनावणीदरम्यान गुन्ह्याचे स्वरूप आरोपांचे गांभीर्य न्यायालयासमोर मांडण्यात आले. मात्र, केवळ गुन्ह्याचे गांभीर्य हा जामीन नाकारण्याचा एकमेव आधार ठरू शकत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. प्रकरणाचा तपास, उपलब्ध पुरावे आणि आरोपीची भूमिका विचारात घेऊन न्यायालयाने त्याला सशर्त जामीन मंजूर केला. जामिनाच्या अटींचे पालन करण्याचे निर्देशही दिले आहेत. दरम्यान, या प्रकरणात बनावट नियुक्त्यांचे आमिष दाखवून आणखी किती जणांची फसवणूक झाली आहे, याचा तपास पर्वरी पोलिसांकडून सुरू आहे.