पणजी, पुढारी वृत्तसेवा: धार्मिक तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली डिचोली पोलिसांनी प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्याविरूद्ध गुन्हा नोंदवला. त्यानंतर त्यांना अटक पूर्व जामीन मिळू नये, म्हणून प्रयत्नात असलेल्या अर्जदारांचे अर्ज फेटाळून मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने वेलिंगकर यांना अटक पूर्व जामीन मंजूर केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांवर टिप्पणी केल्या प्रकरणी एका ख्रिस्ती धर्मगुरुला अटक झाली होती. त्यांना चौथ्या दिवशी जामीन मिळाला होता. तोच न्याय वेलिंगकर यांच्या बाबतीतही लागू होणार, असे खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केले होते. पण वेलिंगकर यांना मात्र अटक झाली नाही. त्यांना अटक करण्यात यावी, म्हणून तक्रारदार आणि इतरांनी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. त्यांनी आपली बाजू तपास अधिकाऱ्यांसमोर ठेवावी, असा सल्ला देऊन उच्च न्यायालयाने त्यांची बाजूही ऐकून घेतली नाही. आणि त्यांना अटक पूर्व जामीन मंजूर केला.