पणजी : गोमंतकीयांना दिलासा देण्यासाठी इथून पुढे घरांमध्ये जेवढे पाणी वापरले जाईल तितकेच शुल्क आकारले जाणार असल्याची योजना पेयजल खात्यातर्फे सुरू करण्यात आली आहे. जर घर/फ्लॅट बंद असले, तर त्यांना 16 युनिटच्या सक्तीच्या शुल्काऐवजी केवळ वापराच्या युनिटचेच बिल भरावे लागेल. 1 सप्टेंबर पासून अशा प्रकारची शुल्क आकारणी होईल, अशी माहिती मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली.
सध्याच्या योजनेनुसार ग्राहकाने पाणी वापरले नसले तरी देखील मीटर भाडे आणि कमीत कमी 16 युनिटचे शुल्क भरावे लागत होते. यामुळे ग्राहकांच्या खिशाला नाहक भुर्दंड सहन करावा लागत होता. मात्र इथून पुढे प्रत्येक घरात जेवढे पाणी वापरले जाईल तितकीच शुल्क आकारणी केली जाणार आहे. विभागाच्या बैठकीत मंत्री सुभाष फळदेसाई बोलत होते. यावेळी मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता तसेच इतर संबंधित पदाधिकारी उपस्थित होते.
याआधी 2021 पासून मोफत पाणी योजना राबवण्यात आली होती. यानुसार 16 हजार लिटरपर्यंत मोफत पाणी पुरवले जात असून तब्बल 40 टक्के ग्राहकांना पाणी शुल्क भरावे लागत नव्हते. मात्र अनेकजण या योजनेचा दुरुपयोग करून एकाच वेळी चार ते पाच मीटर वापरत असल्याचे समोर आल्याने 1 मे पासून सदर योजना बंद करण्यात आली. त्यामुळे इथून पुढे प्रत्येकाला वापरानुसार शुल्क भरावे लागणार आहे.
म्हणून मोफत पाणी योजना बंद!
सामान्यांसाठी सुरू केलेली मोफत पाणी योजना 1 मे पासून बंद करण्यात आली आहे. अनेकजण एकाच वेळी चार- चार मीटर बसवून पाण्याचा दुरुपयोग करत असल्याचे समोर आले. दुसरीकडे सरकारला पाणी शुद्धी करण्यासाठी प्रति लिटर 20 रुपये मोजावे लागतात. मात्र यासाठी ग्राहकाला केवळ 4 रुपये आकारले जात असून वरील 16 रुपयांचा भार सरकारवर पडत होता. यामध्ये कोट्यवधीचा भार सरकारच्या तिजोरीवर पडत असल्याने, मोफत पाणी पुरवणे बंद करावे लागले.