गोवा

CM Pramod Sawant | 'सुभाष फळदेसाईंना डावलले जाणार नाही!' सांगे मतदारसंघातील पेचावर मुख्यमंत्री अन् दामू नाईक यांचे आश्वासन

CM Pramod Sawant | 'सांगे'चा पेच सोडविण्याचे भाजपचे आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

  • मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्याशी दीड तास चर्चा

  • मंत्री सुभाष फळदेसाईंच्या कार्यकर्त्यांची नाराजी दूर

पणजी : पुढारी वृत्तसेवा
समाजकल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांचा सांगे मतदारसंघ आदिवासी (एसटी) प्रवर्गासाठी राखीव होत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या समर्थकांमध्ये निर्माण झालेली नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सोमवारी फळदेसाई यांच्यासह त्यांच्या समर्थकांची पणजी कार्यालयात बैठक घेतली.

सुमारे दीड तास झालेल्या या बैठकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि दामू नाईक यांनी प्रत्येक कार्यकर्त्याचे म्हणणे ऐकून घेत त्यांच्या शंकांचे निरसन केले. यावेळी फळदेसाई यांना डावलणार नसल्याचे आश्वासन देण्यात आले.

सांगे मतदारसंघ एसटीसाठी राखीव होणार असल्याच्या चर्चेनंतर फळदेसाई यांचे समर्थक आक्रमक झाले होते. काही समर्थकांनी फळदेसाई यांच्या निवासस्थानी जाऊन आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे या विषयाची राज्यभर चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर भाजपने तातडीने बैठक घेऊन कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, नाराज कार्यकर्त्यांचे मनभेद दूर करण्यात आले आहेत. गेली १५ वर्षे सुभाष फळदेसाई सांगे मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. आता हा मतदारसंघ राखीव होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची नाराजी आहे. मात्र, सांगे मतदारसंघ राखीव झाला, तरी सुभाष फळदेसाई यांचा योग्य तो सन्मान पक्षाकडून कायम राखला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

सुभाष फळदेसाई हे भाजपचे मोठे नेते आहेत. त्यांना डावलले जाणार नाही. प्रत्येकाने पक्षाचे काम सुरू ठेवावे. राजकारणात काही बदल होत राहतात; मात्र त्या बदलांवरही योग्य तोडगा काढता येतो. सांगे मतदारसंघाच्या एसटी आरक्षणाला भाजपच्या कोणत्या ही नेत्याचा विरोध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मी पक्षाचा शिस्तबद्ध कार्यकर्ता : फळदेसाई

सांगे मतदारसंघ एसटीसाठी आरक्षित झाला तरी आपला किंवा आपल्या कार्यकर्त्यांचा त्याला विरोध नाही. हे आपण यापूर्वीही स्पष्ट केले आहे. आपल्या नाराज कार्यकर्त्यांचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी तत्काळ समाधान केल्याने चांगले झाले.

त्यांच्यासोबत झालेल्या चर्चेने कार्यकर्तेही समाधानी झाले आहेत. आपण पक्षाचा शिस्तबद्ध कार्यकर्ता असून यापुढेही पक्षासोबतच काम करणार आहोत, असे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी यावेळी स्पष्ट केले.

राष्ट्र प्रथम, पक्ष द्वितीय, व्यक्ती तृतीय : दामू नाईक

प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणाले की, गेल्या दोन दिवसांत सांंगेतील भाजप कार्यकर्त्यांमध्ये काही गैरसमज निर्माण झाले होते. त्यामुळे त्यांनी रोष व्यक्त केला आणि त्याचे पडसाद राज्यभरात उमटू लागले. त्यासाठीच सुभाष फळदेसाई आणि त्यांच्या समर्थकांना पणजीत बोलावून घेण्यात आले.

भाजपमध्ये नेहमीच 'राष्ट्र प्रथम, पक्ष द्वितीय आणि व्यक्ती तृतीय' असे स्थान असते. त्यामुळे प्रत्येकाने पक्षासाठी काम केले पाहिजे, हे लक्षात घ्यावे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आपण सक्रिय कार्यकर्त्यांच्या शंकांचे समाधान केले आहे. सुभाष फळदेसाई सांंगेत काम करीत राहतील. मतदारसंघ राखीव झाल्यास त्यावर योग्य तोडगा काढला जाईल. फळदेसाई यांना पक्ष योग्य ते स्थान कायम देईल, असे दामू नाईक यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT