Subhash Phal Desai  
गोवा

Subhash Phal Desai | "तुमचे भवितव्य पाहाल, पण आमचे काय?" मंत्री सुभाष फळदेसाईंच्या घराबाहेर भाजप कार्यकर्त्यांचा ठिय्या

Subhash Phal Desai | सांगे मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव होण्याची शक्यता असल्याने समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी कुडचडे मतदारसंघाकडे लक्ष केंद्रित केल्याच्या चर्चेने सांगे भाजपमध्ये रविवारी संतापाचा उद्रेक झाला.

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : पुढारी वृत्तसेवा
सांगे मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव होण्याची शक्यता असल्याने समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी कुडचडे मतदारसंघाकडे लक्ष केंद्रित केल्याच्या चर्चेने सांगे भाजपमध्ये रविवारी संतापाचा उद्रेक झाला. कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता कुडचडेतून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केल्याचा आरोप करत शेकडो कार्यकर्त्यांनी केपे येथील त्यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या मांडला. 'तुमचे राजकीय भवितव्य तुम्ही पाहाल; मात्र आमचे काय?' असा सवाल करत कार्यकर्त्यांनी फळदेसाई यांना घेरले.

रविवारी सकाळपासूनच सांगेतील भाजप कार्यकर्ते केपे येथील त्यांच्या निवासस्थानासमोर जमा होऊ लागले. यामध्ये पंचायत क्षेत्रातील कार्यकर्त्यांसह सांगे नगरपालिकेतील नगरसेवकांचाही समावेश होता.
कार्यकर्त्यांनी फळदेसाई यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. सुभाष फळदेसाई यांनी आंदोलकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, फळदेसाई यांचे म्हणणे पूर्ण होण्यापूर्वीच कार्यकर्त्यांनी त्यांना पुन्हा प्रश्नांनी घेरले.

सांगेकरांनी चार वेळा अनुसूचित जमातीचे आमदार निवडून दिले आहेत. मागील वेळी जिल्हा पंचायत सदस्यही अनुसूचित जमातीचाच निवडून दिला. मग इतर समाजांना प्रतिनिधित्वाची संधी कधी मिळणार, असा सवाल सूर्यकांत नाईक, गुरुदास नाईक आदींनी केला. बायो भंडारी यांनीही यावेळी आपली भूमिका मांडताना २०२२ च्या निवडणुकीत भंडारी समाज फळदेसाई यांच्या पाठीशी उभा राहिला होता, याची आठवण करून दिली.


सांगे मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव होण्याच्या शक्यतेने फळदेसाईंसमोर निर्माण झालेला राजकीय पेच आता भाजपच्या अंतर्गत संघर्षाचे रूप घेत असल्याचे या आंदोलनातून स्पष्ट झाले. फळदेसाई यांच्यासाठी कुडचडे हा संभाव्य पर्याय मानला जात असला, तरी सांगेतील पक्ष संघटनेची नाराजी दूर करूनच पुढील राजकीय निर्णय घ्यावा लागणार असल्याचे या आंदोलनाने भाजप नेतृत्वाला दाखवून दिले आहे.

पक्षाकडून माझ्यावर अन्याय होणार नाही : फळदेसाई

गेल्या ३० वर्षांपासून पक्षासाठी घेतलेल्या मेहनतीची आणि निष्ठेची दखल घेत भारतीय जनता पक्ष आपल्यावर कोणताही अन्याय करणार नाही, असा ठाम विश्वास मंत्री सुभाष फळदेसाई यांनी व्यक्त केला आहे. सांगे मतदारसंघात संभाव्य एसटी आरक्षणाची शक्यता दिसून येत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली असून, समर्थकांनी मोठ्या संख्येने त्यांच्या निवासस्थानी एकत्र येत पाठिंबा दर्शवला.

दामू नाईक यांच्या भूमिकेवर आक्षेप

भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या भूमिकेवरही कार्यकर्त्यांनी तीव्र आक्षेप घेतला. कुडचडे मतदारसंघात विद्यमान आमदार नीलेश काब्राल सक्रिय असताना त्यांच्या विरोधात प्रचार करणाऱ्या रोहन गावस-देसाई यांच्यावर कारवाई का केली जात नाही, असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला. सुभाष फळदेसाई देवदर्शनासाठी कुडचडे येथे गेले असताना त्यांच्यावर कारवाईची भाषा केली जाते; मात्र रोहन गावस-देसाई यांच्या कथित राजकीय हालचालींकडे दुर्लक्ष का केले जात आहे, असा प्रश्नही कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. दामू नाईक यांनी सांगीत येऊन कार्यकर्त्यांसमोर या सर्व बाबींवर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. पंच सदस्य सूर्यकांत नाईक यांनी दामू नाईक यांनी इतर मागासवर्गीय समाजाच्या मतांची आवश्यकता आहे की नाही, हे स्पष्ट करावे, असे आवाहन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT