पणजी : सक्तीच्या धर्मांतरणाविरोधात राज्यात कठोर कायदा लवकरच केला जाईल. हा कायदा अत्यावश्यक आहे, जेणेकरून सक्तीच्या किंवा फसवणूक करून होणार्या धर्मांतरणाच्या घटनांना अटकाव करता येईल, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले. उत्तर प्रदेशातील सक्तीच्या धर्मांतरण प्रकरणातील आरोपी आयेशाला गोव्यात अटक केल्याने आमदार प्रेमेंद्र शेट आणि क्रुझ सिल्वा यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. या प्रकरणी विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.
लक्षवेधीवर बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले की, उत्तर प्रदेशातील गाजलेल्या सक्तीच्या धर्मांतर प्रकरणातील आरोपी आयेशाला गोव्यात अटक केल्याने काही पुरावे गोव्यातील आहेत. आयेशाचे पालक काही दिवस गोव्यात वास्तव्यास होते, तर ती राज्याबाहेर शिक्षण घेत होती. या प्रकरणाच्या तपासावर सध्या काम सुरू असून, प्राथमिक टप्प्यात असल्यामुळे अधिक माहिती उघड करता येणार नाही, असे त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, सक्तीच्या धर्मांतरणाविरोधात राज्यात कठोर कायदा अत्यावश्यक आहे, जेणेकरून सक्तीच्या किंवा फसवणूक करून होणार्या धर्मांतरणाच्या घटनांना अटकाव करता येईल. या प्रकरणी गोवा पोलिस आणि उत्तर प्रदेश पोलिस यांच्यात मागील आठ दिवसांपासून समन्वयाने तपास सुरू असून, आयेशाचा शोध लावण्यात गोवा पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मुख्यमंत्री डॉ.सावंत यांनी ग्रामपंचायत स्तरावर अधिक दक्षता घेण्याचे आवाहन केले. पंचायती आणि पंचायत सदस्यांनी अशा संवेदनशील प्रकरणांत पोलिस आणि प्रशासनाशी सहकार्य करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.