पेडणे : पुढारी वृत्तसेवा
मोरजी पंचायत क्षेत्रासह पेडणे तालुक्यात, विशेषतः मांद्रे मतदारसंघातील किनारपट्टी भागात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून, त्यांचा उपद्रव आता नागरिक आणि पर्यटकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न बनला आहे. रस्ते, वाडे, बाजारपेठा आणि निवासी परिसरात टोळक्याने फिरणाऱ्या या कुत्र्यांकडून नागरिकांचा पाठलाग करणे, चावा घेणे तसेच पाळीव प्राण्यांवर हल्ले करण्याच्या घटना घडत असल्याने संबंधित यंत्रणांनी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
मोरजी हा आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावरील महत्त्वाचा किनारी भाग असून, येथे देशी-विदेशी पर्यटकांची मोठी वर्दळ असते. अनेक पर्यटक तसेच स्थानिक नागरिक भूतदया म्हणून भटक्या कुत्र्यांना अन्न देतात. मुक्या प्राण्यांना अन्न देणे चुकीचे नाही; मात्र त्याचबरोबर त्यांच्या वाढत्या संख्येचे नियोजन, निर्बीजीकरण, लसीकरण आणि नियंत्रण याकडेही प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.
भटक्या कुत्र्याने एखाद्या नागरिकाला किंवा पर्यटकाला चावा घेतला, अपघात झाला अथवा लहान मुलांवर किंवा पाळीव प्राण्यांवर हल्ला झाला, तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
मोरजी पंचायतीची ग्रामसभा सरपंच विलास मोरजे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी पंचायत क्षेत्रातील बेवारस कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवावर सविस्तर चर्चा झाली.
या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी सोनू शेटगावकर, तुकाराम शेटगावकर आणि निवृत्ती शिरोडकर यांनी केली. यावेळी यासंदर्भात ठराव मंजूर करण्यात आला असून, त्याची कारवाई करण्यासाठी संबंधित विभागाला स्मरणपत्र देण्यात येणार असल्याची माहिती सरपंच विलास मोरजे यांनी दिली.