होंडा : संतप्त जमावाने केलेले वाहनाचे नुकसान. 
गोवा

होंड्यात ‘नरकासुरा’वरून धूमशान

होंडा पोलिस ठाण्यावर 200 जणांच्या जमावाकडून दगडफेक

पुढारी वृत्तसेवा

वाळपई : नरकासुर वध साजरा करीत असतानाच कर्णकर्कश आवाजामुळे संतप्त झालेल्या एकाने होंडा पोलिस ठाण्यात रविवारी रात्री तक्रार दाखल केल्यानंतर सुमारे 200 पेक्षा अधिक लोकांच्या जमावाने तक्रारदाराला जीवे मारण्याची धमकी दिली. होंडा पोलिस ठाण्यासमोरच तक्रारदाराच्या कारची जमावाने मोठ्या प्रमाणात तोडफोड करून पोलिस ठाण्यावर दगडफेक केली.

या प्रकरणी होंडा पंचायतीच्या सहभागी सदस्यांवर कठोरकारवाईची मागणी होंडा येथील रूपेश पोके यांनी वाळपई पोलिस ठाण्यात तक्रारीद्वारे केली असून, कारचे नुकसान करणार्‍या जमावातील संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. ही घटना होंडा पोलिस ठाण्यासमोरच घडल्यामुळे लोकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जमावामध्ये होंडा पंचायतीचे काही पंचायत सदस्य होते. त्यांच्यावरही कारवाईची मागणी पोके यांनी केली आहे. दरम्यान, होंडा भागात नरक चतुर्थीच्या पूर्वसंध्येला तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. सध्यातरी तणावपूर्ण शांतता आहे. आपल्याला पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी पोके यांनी केली आहे. दरम्यान, प्राप्त माहितीनसार सदर प्रकरण वरिष्ठ अधिकार्‍यापर्यंत पोहोचले आहे. सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी लोकांनी केली आहे.

रुपेश पोके यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, 19 ऑक्टोबर रोजी संध्या. 7 च्या सुमारास गौतम लक्ष्मण पार्सेकर, गिरीश लक्ष्मण पार्सेकर, नीलेश रंगनाथ परब, व्यंकटेश च्यारी यांनी आपल्या घराच्या बाजूला असलेल्या सार्वजनिक रस्त्यावर खुर्च्या घालून रस्ता अडविला व कर्णकर्कश आवाजात संगीत लावले होते. या संदर्भात, रुपेश पोके यांनी पोलिस तक्रार केली व पुरावेही सादर केले. याची दखल घेऊन त्यांनी पोलिस फौज फाट्यासह सदर ठिकाणची यंत्रणा बंद केली. पुन्हा एकदा संबंधितांनी कर्कश आवाज सुरू केल्यानंतर रुपेश पोके व त्याचा शेजारी सुनील अशोक नाईक यांनी प्रत्यक्षपणे वाळपई पोलिस ठाण्यावर धाव घेऊन या संदर्भात लेखी तक्रार सादर केली व या संदर्भात कारवाई करण्याची मागणी केली. रुपेश पोके व त्यांचा शेजारी सुनील नाईक दोघेही त्यानंतर कारमधून पणजीत गेले.

पुन्हा एकदा सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन

नरकासुर वध कार्यक्रमात रात्री 10 पर्यंतच साऊंड सिस्टिमला परवानगी होती. त्यानंतर आवाज पूर्णपणे बंद करण्यासंदर्भातचे आदेश सरकारने दिले होते. रात्री 10.30 वा. पुन्हा एकदा पंचायत सदस्य कृष्णा गावकर यांच्या नेतृत्वाखाली कर्कश आवाजाला सुरुवात झाली. यामुळे पुन्हा एकदा या संदर्भातील माहिती स्थानिक पोलिसांनादेण्यात आली.

रुपेशला आमच्या ताब्यात द्या

जोपर्यंत रुपेश पोके यांना आमच्या ताब्यात देत नाही तोपर्यंत गप्प बसणार नसल्याचा इशारा उपस्थित लोकांनी दिला. या जबानीत सरपंच शिवदास माडकर, पंचायत सदस्य कृष्णा गावकर यांच्यासह गौतम पार्सेकर, गिरीश पार्सेकर, गौरीश पार्सेकर, नीलेश रंगनाथ परब, विशाल तुकाराम नाईक, सुरज बाबाजी देसाई ,विशाल तुकाराम नाईक, व्यंकटेश च्यारी व इतर अनेकांचा समावेश होता.

बेकायदा बांधकामाविरोधात तक्रार केल्यामुळेच प्रकरण

दाखल केलेल्या तक्रारीत रुपेश पोके यांनी म्हटले आहे की, 4 सप्टेंबर रोजी होंडा सरपंचांविरोधात बेकायदेशीर बांधकामांविरोधात तक्रार दिली होती. सदर तक्रार मागे घेण्यासाठी आपल्यावर वेगवेगळ्या पद्धतीने दबाव आणणचा प्रयत्न केला. मात्र आपण ती तक्रार मागे न घेतल्यामुळे आपणाला धमकाविण्यासाठी सदर प्रकरण पद्धतशीरपणे घडवून आणले, असा आरोप पोके यांनी केलेला आहे.

तक्रारदाराच्या वाहनाची जमावाकडून तोडफोड

दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत रूपेश पोके यांच्या गाडीचे जमावाने नुकसान केले. त्याचप्रमाणे गाडीमध्ये असलेल्या सामानाचे नुकसान केले. पोलिस चौकीवर दगडफेक केल्याचे तक्रारीत स्पष्ट केलेले आहे. काही अज्ञात व्यक्तीने आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आपल्या शोल्डरला दुखापत झाल्याचे पोके यांनी स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे आपल्या सोबत असलेले आपला 4 वर्षीय मुलगा व शेजारी सुनील नाईक यांची अज्ञातांनी सुदैवाने या जमावातून सुटका करून घेतली. या प्रकरणांमध्ये स्थानिक पंच सभासद कृष्णा गावकर हा जमावाला संतप्त करण्याचा प्रयत्न करीत होता, असा आरोप त्यांनी केलेला आहे. होंडा पोलिस चौकीवर कमी कर्मचारी असल्यामुळे पोलिस उपनिरीक्षक सनिशा नाईक हतबल झाला तरीसुद्धा त्यांनी एकूण परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT