पणजी : गोव्याची पहिली आध्यात्मिक क्रूझ सोमवारी (दि. 10 रोजी) मांडवी नदीवर तरंगणार आहे. तपोभूमीच्या अध्यात्मिक महोत्सवाचे औचित्यसाधून या जल सफरीचे उद्घाटन केले जाणार आहे. यावेळी विविध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातील, अशी माहिती श्री क्षेत्र तपोभूमी संस्थानच्या पदाधिकार्यांनी दिली.
मांडवी नदीत गोव्यातील पहिली आध्यात्मिक क्रूझ बोट सेवा सुरू होणार आहे. पर्यटन खात्याच्या सहकार्याने या संदर्भात एक पायलट प्रोजेक्ट राबविला जात आहे. तपोभूमी अध्यात्म महोत्सवाचे प्रचार प्रमुख फोंडू अश्वेकर म्हणाले की, अध्यात्म महोत्सव संपूर्ण गोव्यात सुरू झाला आहे आणि त्याचा एक भाग म्हणून, गोवा समुद्र सफर, ही आध्यात्मिक क्रूझ बोट टूर सुरू केली जाणार आहे. ही बोट 10 मार्च रोजी दुपारी 4.30 वाजता मांडवी जेटी येथे पोहोचेल. या बोटीमध्ये क्रीडा आणि मनोरंजन कार्यक्रम, संगीत, सामूहिक हनुमान चालीसा पठण आणि संत उद्बोधन कार्यक्रम असतील, असे अश्वेकर म्हणाले. आम्ही मांडवीच्या काठावर असलेल्या परशुराम पुतळ्याशेजारी गंगा आरती करण्याचा निर्णय घेतला आहे. बोटीत बसलेले आणि इतर क्रूझ बोटींवरील पर्यटकांना गंगा आरतीचे एक अनोखे दृश्य पाहायला मिळेल, असे अश्वेकर म्हणाले.
दरम्यान, गोवा पर्यटन विकास महामंडळाने आध्यात्मिक पर्यटनाचा भाग म्हणून मांडवी नदीच्या काठावर गंगा आरती सुविधा उभारण्याचा निर्णय घेतला आहे आणि महामंडळाने यात तपोभूमीचा समावेश केला आहे. या गंगा आरती सुविधेसाठी महामंडळ आणि आमच्यामध्ये एक बैठक झाली. नार्वे हे ठिकाण खूप दूर आहे आणि ते दूर असल्याने जास्त पर्यटक येणार नाहीत, त्यामुळे गंगा आरती मांडवी नदीच्या किनार्यावर केली जाणार आहे.
पणजीतील परशुराम पुतळ्याजवळ गंगा आरती सुविधा निर्माण करावी. जेणेकरून पणजीत येणारे अनेक पर्यटक यामध्ये सहभागी होतील आणि क्रूझ बोट ट्रिप घेणार्यांना हे पाहण्याची संधी मिळेल. पणजीला गंगा आरतीची संकल्पना यशस्वी होईल, असे आम्ही म्हटले होते, असे अश्वेकर म्हणाले. त्यासाठी महामंडळाने निविदा काढली आहे आणि जुने तीर्थ येथे 10 कोटी रुपये खर्चून 240 दिवसांत ही सुविधा पूर्ण करायची आहे. यामध्ये पूजा मंडप, आरती स्टेज, बसण्याची व्यवस्था, तिकीट काऊंटर, तरंगती जेटी, बोटी, आकर्षक महादेव मूर्ती, हॉटेल आणि सजावट यांचा समावेश आहे.