ठळक मुद्दे
हडफडे नाईट क्लब आग दुर्घटनेनंतर प्रशासन सतर्क
६० दिवसांची इनडोअर फटाके, स्पार्कलर्स व फ्लेम/धूर उपकरण बंदी जाहीर
पोलिस अहवालानुसार अशा उपकरणांमुळे जीवितास गंभीर धोका निर्माण
जिल्हाधिकारी एग्ना क्लीटस यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ अंतर्गत आदेश जारी
मडगाव : पुढारी वृत्तसेवा
हडफडेतील नाईट क्लबमध्ये घडलेल्या भीषण अग्नितांडवाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण गोवा जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. नाइट क्लब, बार-रेस्टॉरंट, हॉटेल, गेस्टहाऊस, बीच रॉक यांसारख्या पर्यटनस्थळांमध्ये इनडोअर फटाके व पायरोटेक्निक्समुळे मानवी जीवितास मोठा धोका निर्माण होत असल्याचा पोलिसांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करत ६० दिवसांची कडेकोट बंदी जाहीर केली आहे.
जिल्हाधिकारी एग्ना क्लीटस, आयएएस, यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये जारी केलेल्या आदेशानुसार BC इनडोअर फटाके, स्पार्कलर्स, फ्लेम/स्मोक इफेक्ट्स किंवा कोणत्याही प्रकारच्या धूर-आगीची साधने वापरण्यास संपूर्ण मनाई करण्यात आली आहे.
पोलिस अधीक्षक, दक्षिण गोवा यांच्या ९ डिसेंबरच्या अहवालात अशा उपकरणांमुळे आग, दाट धूर, गोंधळ, चेंगराचेंगरीची परिस्थिती आणि जीवितास गंभीर धोका निर्माण होत असल्याचे नमूद करण्यात आले होते.
त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश तत्काळ लागू केला. हा आदेश ९ डिसेंबरपासून पुढील ६० दिवस लागू राहणार असून उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता (BNS) २०२३ च्या कलम २२३ अंतर्गत कारवाई होणार आहे. उपजिल्हाधिकारी व एसडीएम यांना तपासणी, एफआयआर नोंदवण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
फक्त अपवादात्मक प्रकरणातच पूर्वलिखित परवानगीसह इनडोअर पायरोटेक्निक्सला मुभा दिली जाणार आहे. हा आदेश सर्व पोलिस ठाण्यांना कळवण्यात आला असून पर्यटन क्षेत्रातील सर्व व्यावसायिकांनी त्याचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.