मडगाव : राज्य मंत्रिमंडळात फेरबदलाच्या चर्चा सुरू असतानाच दहा महिन्यांपूर्वी दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षपदाचा ताबा घेतलेल्या संजना वेळीप यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. वरिष्ठांच्या आदेशानंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात त्यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली होती. त्यांच्यासाठी सुवर्णा तेंडुलकर यांच्याकडूनही अशाच पद्धतीने तडकाफडकी राजीनामा घेण्यात आला होता. विशेष म्हणजे साडेतीन ते चार महिन्यांत जिल्हा पंचायतींचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे.दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्षपद महिलांसाठी राखीव असल्यामुळे त्यापदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जि. पं. सदस्य सिद्धार्थ गावस यांनी नगराध्यक्षांच्या राजीनामाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.