पणजी : हरियाणातील भाजप नेत्या सोनाली फोगाट हत्या प्रकरणातील दुसरा आरोपी सुखविंदर सिंग याला न्यायालयाने पुन्हा एकदा परदेश दौऱ्याची परवानगी दिली आहे. पत्नीशी बिघडलेले वैवाहिक संबंध सुधारण्यासाठी परदेशात जाणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद मान्य करत उत्तर गोवा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश इर्शाद आगा यांनी ३० जानेवारी ते २० फेब्रुवारी २०२६ दरम्यान प्रवासास परवानगी दिली.
आरोपपत्र दाखल झाल्यानंतर पत्नी नाराज असल्याने तिच्यासोबत परदेशात वेळ घालवून नातेसंबंध सुधारायचे असल्याचे सिंग याने अर्जात नमूद केले होते. सध्या कोलवाळ कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या सिंगने भारताबाहेर जाण्याने वैवाहिक संबंध दृढ होतील, असा दावा केला. फोगाट खूनप्रकरणी न्यायालयात आरोपपत्र पोलिसांनी दाखल केल्यावर सुखविंदर सिंग आणि त्याच्या पत्नीमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या टप्प्यावर (आरोप ठरविण्यापूर्वी) विशेष परिस्थिती लक्षात घेता परदेश दौऱ्याची परवानगी देता येऊ शकते.
अर्ज नाकारल्यास वैवाहिक मतभेद वाढण्याची शक्यता आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. गेल्या वर्षीही सिंगला पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी इंडोनेशियाला जाण्याची परवानगी न्यायालयाने दिली होती. २३ जानेवारी रोजी दिलेल्या आदेशानुसार, सिंग याला ३० जानेवारीला भारत सोडून २० फेब्रुवारीपर्यंत गोव्यात परत येण्याची मुभा देण्यात आली आहे.
सुनावणीदरम्यान सिंगने पत्नीला फुकेत (थायलंड) आणि त्यानंतर दुबई येथे लग्नाच्या वाढदिवसानिमित्त (१८ फेब्रुवारी) घेऊन जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र सरकारी वकिलांनी या अर्जाला विरोध करत आरोपी पळून जाण्याची शक्यता व्यक्त केली. तसेच प्रकरण सध्या आरोप ठरविण्याच्या टप्प्यावर असल्याने आरोपीची उपस्थिती अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. सिंग हा खुनात थेट सहभागी असल्याचा दावा वकिलांनी केला. न्यायालयाने मात्र कडक अटींसह परवानगी दिली आहे. भारतात परतल्यानंतर चार दिवसांत पासपोर्ट सीबीआयकडे जमा करणे, सीबीआयला संपर्क क्रमांक देणे, सर्व सुनावण्यांना उपस्थित राहणे आणि आधीच्या जामिनाच्या अटींचे पालन करणे संशयिताला बंधनकारक आहे.