पणजी : काव्या कोळस्कर
सध्या देशभरातील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम इंधन पुरवठ्यावर होत असून, एलपीजीच्या दरवाढीबरोबरच पुरवठ्यातील मर्यादेमुळे गोव्यातील अनेक लहान हॉटेल्स आणि भोजनालये बंद पडली आहेत. याचा थेट फटका पणजी आणि आसपासच्या भागातील कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदारांना बसत आहे. घरापासून दूर राहणारे अनेक कर्मचारी रोजच्या जेवणासाठी स्थानिक घरगुती खानावळ किंवा लहान हॉटेल्सवर अवलंबून असतात.
मात्र, यापैकी बहुतांश खिशाला परवडणारी हॉटेल्स बंद झाल्यामुळे त्यांच्यासमोर मोठे अन्नसंकट उभे ठाकल्याचे त्यांनी पुढारीशी बोलताना सांगितले. मी मागील अनेक वर्षांपासून फोंड्यात फार्मा कंपनीत कामाला आहे. दररोज कामाच्या अतिरिक्त वेळेमुळे बाहेरच जेवण करत होतो. पण आता जवळपासची सर्व लहान हॉटेल्स बंद झाली आहेत. रोज नवीन ठिकाण शोधणे आणि महागडे जेवण घेणे खूप कठीण झाले आहे,' असे कर्मचारी सिद्धेश मगदूम यांनी सांगितले.
दुसरीकडे, काही कर्मचारी घरून डबे आणण्याचा प्रयत्न करत असले तरी सर्वांसाठी ते शक्य नाही. 'मी शेअर्ड रूममध्ये राहतो, जिथे स्वयंपाकाची सोय नाही. आता रोज वडापाव, समोसा किंवा उपाशी राहण्याची वेळ येतेय किंवा खूप महागडे अन्नपदार्थ ऑर्डर करावे लागत आहेत, अशी माहिती सांतिनेज परिसरात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने दिली. 'एलपीजी सिलिंडरचे दर प्रचंड वाढले आहेत आणि पुरवठाही वेळेवर होत नाही.
अशा परिस्थितीत पणजीसारख्या ठिकाणी हॉटेल चालवणे अशक्य झाले आहे, त्यामुळे काही दिवस पूर्णवेळ तर काही अर्धा वेळ आम्हाला उपहारगृह बंद करावे लागले. २१ किलोचा व्यावसायिक सिलेंडरचा आधीचा दर २०७० रुपयांच्या आसपास होता. तो सध्या ३८८५ रुपये झाला. तर त्याची किंमत अजून वाढून ४३०० पर्यंत होणार असल्याचे कळते. तर १९ किलोच्या सिलेंडरची किंमत १९५० वरून २२०० वर पोहोचल्याने सध्या आम्ही चूल पेटवली आहे.
दरम्यान, चहा कॉफीच्या किमतीत आम्हाला वाढ करावी लागल्याने नियमित ग्राहकांनी थोडी नाराजी व्यक्त केल्याचे, सांतिनेजमधल्या एका उपहारगृहाचे व्यवस्थापक सचिनशेट्टी सांगितले. आणखी एक हॉटेल मालक म्हणाले, आमच्याकडे रोज येणारे ग्राहक आता परत जातात, कारण आम्ही सेवा देऊ शकत नाही. कर्मचारी पगार, भाडे आणि इंधन खर्च यात ताळमेळ बसत नाही. ही परिस्थिती लवकर सुधारली नाही तर कायमस्वरूपी बंद करावे.
वेळीच परिस्थिती सुधारण्याची गरज
हॉटेल मालकांनाही या परिस्थितीचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. वाढत्या एलपीजी दरामुळे व्यवसाय चालवणे कठीण झाले आहे. त्यामुळे राजधानी पणजीसह राज्यभरातील इतर अनेक ठिकाणी महत्त्वाची हॉटेल्स भोजनाले बंद झाली आहेत तर ज्यांच्याकडे चूल पेटवण्यासाठी जागा आहे अशा हॉटेल व्यवसायिकांनी चक्क चुलीवर जेवण बनवायला सुरुवात केली आहे.
मात्र, तरीही समस्या सुटली नसून चुलीसाठी लागणारे पर्याप्त इंधन गोळा करणे देखील डोकेदुखी असल्याचे, अनेकांनी सांगितले. आता व्यावसायिक गॅस सिलेंडर पुरवठ्यात वाढ होत असली तरी किमतीही गगनाला भिडत असल्याने पर्यायाने अन्नपदार्थांच्या किंमती वाढवाव्या लागत असल्याने व्यवसायावर परिणाम होत आहे. त्यामुळे सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी हॉटेल चालक करत आहेत.