मडगाव : प्यायला पाणी न दिल्याच्या कारणाने रागावलेल्या वडिलांनी स्वतःच्या सहा वर्षीय चिमुकल्या मुलीला फावड्याच्या दांड्याने केलेल्या मारहाणीत तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कुडतरी-माकाझन येथे घडली. मयत मुलीचे नाव सानिका असे असून, तिच्या मृत्यूचा प्रकार समोर आल्यानंतर वडील सलीम दंभाळ हा पसार झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी रात्री घडली. सलीम हा मूळ गदग कर्नाटक राज्यातील असून चतुर्थश्रेणी कामगार म्हणून तो व त्याची पत्नी राज्यात विविध ठिकाणी काम करतात. आठ दिवसांपूर्वी तो आपल्या कुटुंबासह गोव्यात आला होता. काम न मिळाल्याने काही दिवस तो मडगावच्या पालिका उद्यानात कुटुंबासह थांबला होता. नुकतेच त्याला माकाझन येथे काम मिळाले होते व तिथेच झोपडीत तो कुटुंबासह राहत होता. सोमवारी रात्री त्याची मुलगी सानिका ही आपल्या आईजवळ कोणत्यातरी वस्तूसाठी हट्ट धरून बसली होती.
त्याचवेळी कामावरून आलेल्या सलीमने त्यांच्याकडे पिण्यासाठी पाणी देण्याची मागणी केली. आई व मुलीचे त्याच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे संतापलेल्या सलीमने उचलून आपल्या पत्नीला मारहाण करण्यास सुरू केले. रागाच्या भरात पत्नीला मारहाण करताना मध्ये आलेल्या मुलीचा त्याला विसर पडला. या मारहाणीत सानिका गंभीर जखमी झाली होती. तिच्या डोक्यावर दांड्याचा प्रहार बसल्यामुळे तिची प्रकृती चिंताजनक बनली होती. तिला स्थानिक रुग्णालयात दाखल केले असता मृत घोषित करण्यात आले. या मारहाणीत सानिका हिची आई सुमय्या दंबाळ आणि लहान भाऊ सनवीत दंबाळ हे दोघे जखमी झाले आहेत. या प्रकरणी मायणा-कुङतरी पोलिसांनी सलीमविरोधात भारतीय न्यायसंहिता व बाल कायदा कलमानुसार गुन्हा नोंद केला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.