पणजी : मतदार यादीच्या विशेष सघन पुनरावलोकनाच्या (एसआयआर) प्रक्रियेत राजकीय पक्षांशी तीन स्तरांवर बैठका घेण्यात आल्या. तसेच, ‘एएसडी’ (अनुपस्थित, स्थलांतरित व मृत) आणि लॉजिकल विसंगती असलेल्या मतदारांच्या याद्याही पडताळणीसाठी राजकीय पक्षांना उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यामुळे प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडल्याचे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) संजय गोयल यांनी स्पष्ट केले.
अंतिम मतदार यादी राजकीय पक्षांना देऊन सात महिन्यांहून अधिक काळ झाला आहे. कोणत्याही पक्षाकडून तक्रार प्राप्त झालेली नसल्याचे गोयल यांनी सांगितले. ‘एसआयआर’नंतर ९७ पात्र मतदारांची नावे अंतिम यादीत समाविष्ट झाली नसल्याबाबत विचारले असता, ही प्रकरणे स्वतंत्रपणे हाताळण्यात आल्याचे गोयल यांनी सांगितले. संबंधित बूथ लेव्हल अधिकाऱ्यांमार्फत (बीएलओ) घरभेटी देऊन फॉर्म भरून घेण्यात आले असून अनेक मतदारांची नावे त्यानंतर समाविष्ट करण्यात आली आहेत. दरम्यान, वृत्तांनुसार ९७ मतदारांच्या प्रकरणांबाबत गोवा सीईओ कार्यालयाकडून फेब्रुवारीमध्ये आठ ई-मेल करण्यात आले होते.