पणजी; विठ्ठल गावडे पारवाडकर : "गोव्यात जे प्रकल्प उभे राहिले व गोव्यात जो बदल घडला आहे, त्यात श्रीपाद नाईक यांचा सिंहाचा वाटा आहे," असे गौरवोद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले. आज केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचा वाढदिवस आणि त्यांना खासदार म्हणून २५ वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्त त्यांच्या रायबंदर येथील निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी पर्यटनमंत्री रोहन खंवटे, आमदार राजेश फळदेसाई, भाजपचे सरचिटणीस दामोदर नाईक, उद्योगपती श्रीनिवास धेंपे, जिल्हा पंचायत अध्यक्ष सिद्धेश नाईक, गोविंद पर्वतकर, डॉक्टर कदम आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री सावंत पुढे म्हणाले की, इस्पितळ, वॉटर स्पोर्टस संस्था, गावागातील सभागृहे आणि अनेक प्रकल्प श्रीपाद भाऊंनी उभे केल्याचे सांगून विरोधी पक्षातील नेत्यांशीही जवळीक असलेले भाजपातील ते एकमेव नेते असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या निवडणुकीमध्ये ते पुन्हा जनतेसमोर जात असून गोव्याची सेवा करण्यासाठी गोमंतकीय मतदारांनी त्यांना पुन्हा एकदा संधी द्यावी, असे आवाहनही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.
सध्याची राजकीय स्थिती व आव्हाने आम्ही राजकीय नेत्यांनी तयार केलेली आहेत. राजकीय फायद्यासाठी आम्ही अनेक तडजोडी करतो. त्यामुळे कालांतराने निर्माण होणार्या आव्हानांचा आम्हाला व समाजालाही सामना करावा लागतो. ही आव्हाने पेलण्यासाठी समाजहितकारी राजकारणाला प्राधान्य देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.
मंत्री नाईक पुढे म्हणाले की, आपणाला जी पदे मिळाली त्यांचा वापर आपण जनतेसाठी केला. लोकहित समोर ठेवून राजकारण केले. लोकांनी भरभरून आशीर्वाद दिला यापुढेही देतील, असे खा. नाईक म्हणाले. भारतीय जनता पक्षाने लोक कल्याण केले आहे. गोवेकरांचे जीवन हितकारी व्हावे यासाठी सरकार काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत बलशाली बनलेला आहे, जगामध्ये भारताचा नावलौकिक वाढला आहे, तो पुढे आणखी वाढणार आहे. असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला आरोग्य तपासणी शिबीराचे व रक्तदान शिबीराचे उदघाटन केले. त्यानंतर श्रीपाद नाईक यांनी खासदार म्हणून २५ वर्षात केलेल्या कामाच्या पुस्तिकेचे प्रकाशन केले. यावेळी आरोग्य तपासणी शिबीराचा लाभ हजारो लोकानी घेतला.