फोंडा : पुढारी वृत्तसेवा
आदिवासी समाजाला (एसटी) त्यांच्या न्याय हक्काच्या राजकीय आरक्षणासाठी गेली तेवीस वर्षे झुलवत ठेवण्यात आले. मात्र, आता नाही तर कधीच नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. आदिवासींशिवाय सत्तेवर येऊन दाखवाच, असे थेट आव्हानच 'उटा' संघटनेने म्हाडोळ येथील आदिवासींच्या महासभेत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या सरकारला दिले.
यावेळी आमदार गोविंद गावडे यांनी सरकारला खडे बोल सुनावताना, 'आम्हाला गृहीत धरू नका; आमचा हक्क आधी आम्हाला द्या', असे सांगितले. 'आमच्या वाटलेला कोणी जाऊ नका, आमच्या वाटलेला जाल तर वाट लावू,' असा इशारा आदिवासींच्या हिताआड येणाऱ्यांना आमदार गोविंद गावडे यांनी दिला. आदिवासी बांधव आपल्या हक्कांसाठी वेळोवेळी लढले आहेत. यावेळी संघर्ष तीव्र आहे. त्यामुळे आदिवासींनी आपल्यातील मतभेद विसरून एकजुटीने लढा देऊ या, असे गावडे यांनी आवाहन केले.
आदिवासींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला त्यांचा संविधानिक हक्क हवा आहे, कुणाची भीक नको आहे. आतापर्यंत आमचा केवळ वापर करण्यात आला. पण झाले ते बस झाले. ज्या आदिवासींनी गोवा वसवला, त्यांना रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे आम्हाला रस्त्यावर आणणाऱ्यांना आम्ही रस्त्यावर आणू. आदिवासींच्या राजकीय आरक्षणासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पुढाकार घेतल्यामुळे विजय दृष्टिक्षेपात आहे. पण कोणी तरी स्वतःला थिंक टँक म्हणून घेणाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालवला जात आहे.
राजकीय आरक्षण दिल्यास सर्व आदिवासी एकदिलाने मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील, अशी गवाहीही गावडे यांनी दिली.
यावेळी आ. आंतोन वास, ॲड. जॉन फर्नांडिस, गोविंद शिरोडकर, अशितोष गावडे, दुर्गादास गावडे तसेच विश्वास गावडे यांनी विचार मांडताना एकजूट कायम राखू या, असे आवाहन केले. मेघराज आकारकर यांनी सूत्रसंचालन केले.
'उटा'चे अध्यक्ष प्रकाश वेळीप म्हणाले की, आदिवासी संघटना आपल्या बारा मागण्या घेऊन वेळोवेळी सरकारकडे गेली आहे. त्यातील महत्त्वाची राजकीय आरक्षणाची मागणी आगामी निवडणुकीपूर्वी पूर्ण व्हायलाच हवी, असे सांगताना प्रत्येकवेळी आम्हाला रस्त्यावर यावे लागले आहे. आता बस झाले, राजकीय आरक्षणासाठी एकसंध होऊया, असे आवाहन त्यांनी केले.
सभा सुरू झाल्यानंतर आणि मध्यावर पावसाच्या जोरदार सरी आल्या, पण कोणीही जागेचे हलले नाही. सात ते आठ हजार लोक यावेळी उपस्थित होते.