Shivaji Maharaj Digital Museum in Goa
पणजीः गोवा राज्याचा ऐतिहासिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक वारसा जगाला कळावा यासाठी गोवा सरकारने विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे गोव्याशी नाते सांगणारे छत्रपती शिवाजी महाराज डिजिटल संग्रहालय हा त्याच विकास प्रकल्पाचा भाग असून येत्या 10 महिन्यात फर्मागुडी होणारे या संग्रहालयाचा पहिला टप्पा पूर्ण होणार आहे. 125.59 कोटी खर्च करून हे संग्रहालय बांधले जाणार आहे. अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली. पणजी येथे आज शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक कुलदीप आरोलकर आणि पर्यटन संचालक केदार नाईक उपस्थित होते.
यावेळी बोलताना खंवटे यांनी सांगितले की गोवा हे फक्त किनारी पर्यटनासाठी प्रसिद्ध होते आता केंद्र आणि राज्य सरकारने गोवा राज्याला ऐतिहासिक आध्यात्मिक पर्यटनक्षेत्र करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. याच प्रयत्नाचा भाग म्हणून फर्मागुडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे डिजिटल संग्रहालय बांधले जाणार आहे. 29 हजार 212 चौरस मीटर जागेमध्ये हे संग्रहालय उभारले जाईल अशी माहिती खंवटे यांनी दिली.
हे संग्रहालय दोन टप्प्यांमध्ये बांधले जाणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आहे त्या किल्ल्याचा विकास केला जाईल व पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या जातील. दुसर्या टप्प्यामध्ये संग्रहालय आणि गरज पडली तरच छत्रपती शिवाजी महाराजांचा नवा पुतळा बसवला जाणार आहेत. त्यासाठी स्थानिक आमदार, ऐतिहासिक अभ्यासकांची मदत घेतली जाणार असल्याचे सांगून एकादश तीर्थ योजनेअंतर्गत गोव्यातील 11 मंदिराचा विकास पर्यटन खात्याने सुरू केल्याचे खंवटे म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज डिजिटल संग्रहालयासाठी केंद्राकडून 97. 46 कोटीचा निधी मिळणार असून राज्य सरकार 28. 13 कोटी रुपये खर्च करणार आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा संबंध गोव्याशी आहे हा इतिहास आहे आणि हा इतिहास नव्या पिढीला कळावा, पर्यटकाना कळावा यासाठी हे संग्रहालय माहितीगार ठरणार असल्याचे खंवटे म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज गोव्याच्या इतिहासाचा भाग आहेत, पोर्तुगीज व्यापार्यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर सकारात्मक लिखाण केलेले आहे. त्यांचे हे संग्रहालय युवकांना प्रेरणा देणारे ठरणार आहे. मंत्रिमंडळाने यापूर्वीच या संग्रहालयात मान्यता दिली आहे. असे खंवटे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या सहकार्याने आणि मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या प्रयत्नाने हे संग्रहालय प्रत्यक्षात येत आहे. हे संग्रहालय पर्यटन केंद्र म्हणून ते विकसित केले जाणार असून जगभरातील जे पर्यटक गोव्यात येतात त्यांनी या संग्रहालयाला भेट द्यावी अशाच पद्धतीने या संग्रहालयाचे होणार आहे अशी माहिती खंवटे यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे नेतृत्व, त्यांचे प्रशासन, समुद्री सैन्य आणि हिंदवी स्वराज्य यासह छत्रपतींचा दरबार, वाडा, किल्ले आरमार, व जीवनपट यांची माहिती या संग्रहायलयात उपलब्ध होणार असून छत्रपती शिवाजी महाराजांना फादर ऑफ इंडियन नेव्ही का म्हणतात याचाही संदर्भ येथे उपलब्ध होणार आहे. ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी हे संग्रहालय उपयुक्त ठरणार आहे. रोहण खंवटे, पर्यटनमंत्री गाेवा