Shiv Sena To Contest 30 Seats Goa Elections
पणजी : गोवा विधानसभेच्या आगामी निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) 30 मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करण्याच्या तयारीत असून त्यासाठी पक्षाने संघटनात्मक बांधणीला वेग दिला आहे. गोव्यातील भाजप सरकार विविध क्षेत्रांत अपयशी ठरल्याचा आरोप करत सध्या तरी भाजपसोबत युती करण्याचा कोणताही विचार नसल्याचे शिवसेना नेते, माजी खासदार आणि माजी मंत्री गजानन कीर्तिकर यांनी स्पष्ट केले.
पणजी येथे बुधवारी (दि.१७) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी गोवा संपर्कप्रमुख सुभाष सावंत, समन्वयक अरुण मोरे, राज्य प्रमुख उपेंद्र गावकर, सरचिटणीस काशिनाथ मयेकर, उत्तर गोवा प्रमुख सुनील सांतिनजकर यांच्यासह पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
कीर्तिकर म्हणाले की, 19 जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन असून ‘शिवसंपर्क अभियान’ राबवून सदस्य नोंदणी सुरू आहे. या अभियानाला गोव्यातील 30 मतदारसंघांत चांगला प्रतिसाद मिळत असल्याने पक्षाने 30 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या पक्षाची भूमिका ‘एकला चलो’ अशी असली तरी भविष्यात पक्षश्रेष्ठींनी युतीबाबत निर्णय घेतल्यास त्यानुसार पुढील भूमिका ठरवली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
गोव्यातील विद्यमान सरकारविरोधात जनतेत नाराजी असल्याचा दावा करत स्थानिक प्रश्न, बेरोजगारी, भूमिपुत्रांवरील अन्याय आणि सेटलमेंट झोनमुळे शेतीवर होणारे परिणाम या मुद्द्यांवर शिवसेना जनतेसोबत संघर्ष करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्र आणि केंद्रात भाजपसोबत युती असली तरी इतर राज्यांमध्ये अशी आघाडी नसल्याचे सांगत गोव्यातही सध्या युतीचा प्रश्न उद्भवत नसल्याचे कीर्तिकर यांनी स्पष्ट केले.
याशिवाय नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग) अहवालाचा दाखला देत त्यांनी राज्यातील आरोग्य व्यवस्था, बेरोजगारी आणि वाढत्या कर्जबाजारीपणावर सरकारवर टीका केली. गोवा अनेक बाबतीत केंद्र सरकार व इतर राज्यांवर अवलंबून असून राज्यावर सुमारे 3,945 कोटी रुपयांचे कर्ज असल्याचा दावाही त्यांनी केला.