- प्रा. रामदास केळकर
लहानपणी जत्रेत जायचा योग आलेला होता. सोबत बंधू किंवा शांताराम गडी असायचा. शिरगाव जत्रेचे आकर्षण तेव्हा असणे साहजिकच. मुख्य म्हणजे तिथे लहान मुलांसाठी पुस्तके विक्रीला असत. लहानपणीही बंधूसह मातोश्री पण होत्या. त्याकाळी अस्नोड्याहून गाडी पकडायची घाई असे. कारण, ती जर चुकली तर पायी चालत जावे लागे. त्याकाळी ते मोठे अंतरच वाटत नसे. त्याकाळी खेळणी वेगळ्या प्रकारची होती. इलेक्ट्रॉनिक खेळण्याचा तो जमाना नव्हता.
आता गर्दी तीच आहे. खेळण्यात मात्र इलेक्ट्रॉनिक खेळण्यांचा शिरकाव झालेला आहे. दुकानांची गर्दी तीच असली तरी मंच्युरियन पदार्थ मिळण्याची सोय झालेली आहे. त्यावर आता बंदी आलेली आहे; पण त्या दुकानात खाण्याची एक वेगळीच मजा होती. अज्ञानात सुख असते त्या नियमानुसार खाण्या-पिण्यात नियमांचे कधी बंधन नव्हते. पुस्तके गायब झालेली आहेत; का तर? ग्राहकांची रुची बदलली आहे. पण खाण्यापिण्याची रेलचेल असल्याने तसेच इथल्या प्रत्येक घरात कोणीही यावे खाऊन जाणे हा रिवाज असल्याने कोणीही उपाशी राहत नाही.
लाकडांचे व्यवस्थित रचलेले होमखंड व अग्निदिव्यासाठी तयार असलेले भक्तजन आणि अग्निदिव्य हे सारे पाहण्यासारखे असूनही मी कधी झोपी जाई, याचा पत्ता लागत नसे. यंदा ड्रोन कॅमेऱ्याने या जत्रेवर निरीक्षण ठेवले जाणार आहे; पण एक खरे या जत्रेत कुणी हरवत नसे.
आता वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था केल्याने थेट मंदिराजवळ जाता येते. बहुतेकांकडे वाहने असल्याने आता बसने येणारे तुरळक अर्थात भक्तजन अर्थात धोंड मंडळी बहुतेकवेळी पारंपरिक पद्धतीने येतात. दुकानांची गर्दी हे या जत्रेचे वैशिष्ट्य म्हणायला हवे. एक मात्र खरे याच जत्रोत्सवांनी आपली परंपरा संवर्धन करायचे मोलाचे काम केले आहे.