मडगाव ः क्रूझला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवताना बंदर कप्तान खात्याचे ‘पैलवान’ टग जहाज.  Pudhari File Photo
गोवा

बंदर कप्तानच्या ‘पैलवान’ला दे धक्का...

अनागोंदी कारभार पुन्हा उघड : साडेपाच कोटींच्या जहाजाची दैनावस्था

पुढारी वृत्तसेवा
विशाल नाईक

मडगाव : मोडकळीला आलेली इमारत, ड्राय डॉक न केल्याने जहाजाला पडलेल्या भेगा, आणि मर्जीच्या कर्मचार्‍यांना देण्यात आलेली अनावश्यक सूट अशा विविध कारणांमुळे चर्चेत असलेल्या बंदर कप्तान खात्याचा आणखी एक अनागोंदी कारभार समोर आला आहे. समुद्रात नादुरुस्त झालेल्या जहाजांना ओढून आणण्याबरोबर जहाजांना लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी सरकारने बंदर कप्तान खात्याला दिलेल्या अग्निशमन क्षमतेने सुसज्ज अशा साडेपाच कोटी रुपये किमतीच्या ‘पैलवान’ नामक जहाजाची अक्षरशः दैनावस्था झाली आहे.

जहाजावरील आगीवर नियंत्रण मिळविणारी यंत्रणा दर पंधरा मिनिटांनी बंद पडते, तर जहाजाच्या मूळ इंजिनमधील मॅग्नेटिक स्विचमध्ये बिघाड झाल्यामुळे 24 व्हॉल्ट क्षमतेच्या दोन अतिरिक्त बॅटरी जोडून धक्का दिल्याशिवाय इंजिन चालू होत नाही. अशा परिस्थितीतील ‘पैलवान’वर समुद्रमार्गावरील सर्व जहाजांची सुरक्षा सोपवण्यात आली आहे.

बंदर कप्तान खात्यातील अनागोंदी कारभारावर कोणाचेच नियंत्रण नाही. दरवर्षी जहाजांचे ड्रायडॉक करणे सक्तीचे असून एकही जहाजाचे गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत एकदाही ड्रायडॉक झालेले नाही. खार्‍या पाण्यामुळे बंदर कप्तान खात्याजवळ असलेल्या सर्व जहाजांच्या तळाला गंज लागून भेगा पडल्या आहेत. दुरुस्तीच्या नावावर भेगा पडलेल्या ठिकाणी सिमेंट लावून व त्यावर रंगकाम करून तात्पुरती दुरुस्ती केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. समुद्रात वाहतूक करणार्‍या मालवाहू बार्ज, प्रवाशांची वाहतूक करणार्‍या फेरीबोटी, जल सफरीच्या पर्यटक बोटी तसेच विदेशातून येणार्‍या क्रूज बोटिंच्या सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकारच्या बंदर कप्तान खात्याकडे आहे. बर्‍याचवेळा तांत्रिक कारणांमुळे किंवा तळाशी रुतल्यामुळे जहाजे समुद्रात अडकण्याचे प्रकार घडत असतात. समुद्रात प्रवास करताना जहाजांना आग लागण्याच्या घटनाही बर्‍याचवेळा घडलेल्या आहेत. अशा जहाजांना दुर्घटनेपासून वाचवण्यासाठी राज्य सरकारने 2013 मध्ये पैलवान नावाची टग बोट सुमारे साडेपाच कोटी रुपये खर्चून खरेदी केली होती. त्यासाठी जुनी बोट 2012 मध्ये भंगारात काढली गेली. 12 मेट्रिक टन बोलार्ड ओढण्याची क्षमता असलेले पैलवान जहाज दोन हजार टन क्षमतेच्या बार्जेस ओढण्यासाठीही सक्षम आहे. या जहाजाचे वैशिष्ट्य म्हणजे ते अग्निशमन क्षमतेने सुसज्ज असून स्वयंचलित ओळख प्रणालीमुळे नियंत्रण कक्षाद्वारे तसेच व्हीएचएफ उपकरणांद्वारे जहाज ट्रॅक केले जाऊ शकते. अशा स्वरूपाचे राज्य सरकारकडे असलेल्या या एकमेव जहाजाच्या यंत्रात बिघाड येऊन आता सहा वर्षे पूर्ण झाली आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पैलवान टग बोटीचे इंजिन सुरू करण्यासाठी वापरण्यात येणारे मॅग्नेटिक स्विच गेल्या तीन वर्षांपासून बंद पडून आहेत. समुद्रा प्रवास करणारी आणि तांत्रिक कारणांमुळे जलमार्ग अडकून पडणार्‍या जहाजांना खेचून आणण्या साठी टग तर जहाजांना लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन यंत्रणा या जहाजावर कार्यरत आहे. मात्र मॅग्नेटिक स्विच मध्ये झालेल्या बिघाडामुळे 24 वोल्ट क्षमतेच्या अतिरिक्त बॅटरीचा वापर केल्याशिवाय बोटचे इंजिन सुरू होत नाही. गेल्या तीन वर्षांपासून याच अवस्थेत ती टग बोट बचाव कार्य राबवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

जहाजावरील आगीवर नियंत्रण मिळविणार्‍या यंत्रणेत बिघाड होऊन आता सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. जहाजावरील अग्निशमन यंत्रणा दर पंधरा मिनिटांनी बंद पडत आहे. आग विझवण्याचे काम सुरू असताना यंत्राच्या तापमानात वाढ होऊन सर्व यंत्रणा बंद पडते. त्यामुळे तापमान उतरेपर्यंत वाट पाहून नंतरच आगीवर पाणी मारण्याचे काम हाती घ्यावे लागत असल्याचे आपले नाव उघड न करण्याच्या अटीवर कर्मचार्‍यांनी सांगितले. अग्निशमन यंत्राची बॅटरी खराब झाली असून दुसरी बॅटरी लावूनच हे यंत्र सुरू करावे लागते, अशी परिस्थिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दरवर्षी जहाजांचे ड्रायडोक करणे सक्तीचे असून पैलवान जहाजाचे गेल्या बारा वर्षात एकदाच ड्राय डॉक झालेले आहे.

बंद कप्तान खात्याचे मौन

गेल्या आठवड्यात मांडवीत एमव्ही के कॅट या पर्यटकांना जलसफरीवर नेणार्‍या बोटला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करताना पैलवान जहाजातील अग्निशमन यंत्रणेत बिघाड झाल्याने बचाव कार्यात तीनवेळा खंड पडला होता. यंत्रातील तापमान थंड होऊन बचाव कार्याला पुन्हा सुरू करेपर्यंत ते जहाज आगीत राख झाले होते. हा प्रकार जवळच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला असून बंदर कप्तान खाते मात्र त्याविषयी मौन बाळगून आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT