डिचोली : लाटंबार्से पंचायत क्षेत्रातून अपहरण केलेल्या 13 वर्षीय मुलीवर अटकेत असलेल्या झारखंड येथील 26 वर्षीय सोसो चंदन मुर्मू या युवकाने लैंगिक अत्याचार केल्याचे मुलीच्या वैद्यकीय तपासणीत सिध्द झाल्याने त्या युवकावर बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अपहरण प्रकरणाचा छडा डिचोली पोलिसांनी अवघ्या काही तासांतच लावण्यात यश मिळविले होते.
डिचोली पोलिस निरीक्षक विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने वेर्णा येथून संशयित सोसो चंदन मुर्मू याच्यासह पीडित अल्पवयीन मुलीसह ताब्यात घेतले होते व मुलीची सुखरूप सुटका करून तिची रवानगी अपना घर येथे करून सोसो मुर्मू याच्या विरोधात गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली होती. लाटंबार्से पंचायत क्षेत्रात राहणारी मूळ झारखंड येथील 13 वर्षीय मुलगी रविवार, दि. 22 जूनपासून बेपत्ता झाल्याची तक्रार संबंधित मुलीच्या वडिलांनी डिचोली पोलिस ठाण्यात केली होती. परंतु ठराविक काळानंतरही मुलगी न सापडल्याने या प्रकरणी डिचोली पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंद केला होता.
बुधवार, दि. 25 जून रोजी सकाळी डिचोली पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंद केला. पोलिस निरीक्षक विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक श्रीधर कामत, विकेश हडफडकर, विराज धावसकर, रश्मीर मातोंडकर, हवालदार नीलेश फोगेरी, पोलिस कॉन्स्टेबल दयेश खंडेपारकर, शैलेश दावणे, महिला पोलिस कॉन्स्टेबल स्मिता पोपकर व प्रचिता गावस यांच्या पथकाने बुधवारी संध्याकाळीच म्हणजे अवघ्या काही तासांतच सदर मुलगी व संशयिताला ताब्यात घेण्यात यश आले होते.
सदर मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे सिध्द होताच सदर सोसो मुर्मू यांच्याविरोधात बालहक्क कायदा, पोक्सो कायद्यांंतर्गत कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी उत्तर गोवा पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता, डिचोली पोलिस उपअधीक्षक विल्सन डिसोझा तसेच पोलिस निरीक्षक विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक सोनाली हरमलकर अधिक तपास करीत आहे.