पेडणे : ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचे शुक्रवारी संध्याकाळी ठाणे येथे अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन कन्या, जावई, मुलगा आणि सून असा परिवार आहे.
रामायण, महाभारताचे व्यासंगी, संतवाङ्मयाचे अभ्यासक असलेल्या दाजींनी 50 वर्षांहून अधिक काळ आपल्या व्याख्याने आणि साहित्यातून समाजाचे प्रबोधन केले. आजोबा वासुदेवशास्त्री पणशीकर यांचा हिंदू धर्मग्रंथ, परंपरा यांचा वारसा त्यांनी पुढे नेला. देशविदेशांत त्यांनी सुमारे अडीच हजार व्याख्याने दिली.
त्यांच्या दैनिकांतील लेखमालाही बर्याच गाजल्या. महाभारत एक सुडाचा प्रवास, कर्ण खरा कोण होता?, कथामृतम, कणिकनिती, शंकराचार्यांच्या स्तोत्रांवर आधारित स्तोत्र गंगा (दोन भाग), अपरिचित रामायण (पाच भाग), गानसरस्वती किशोरी आमोणकर - आदिशक्तीचा धन्योद्गार अशा त्यांच्या विविध ग्रंथांच्या आजवर 30 हून अधिक आवृत्या निघाल्या आहेत. विषयाचा व्यासंग, सखोल चिंतन, स्पष्ट भूमिका आणि परखड विवेचन ही त्यांच्या लिखाणाची आणि वक्तृत्वाची वैशिष्ट्ये आहेत.