धाराशिव : पुढारी वृत्तसेवा
मुंबई, पुणे, सोलापूर अशा ठिकाणांचे कनेक्शन समोर आलेल्या तुळजापूरच्या ड्रग्ज तस्करी प्रकरणातील २१ आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. याप्रकरणी १४ आरोपी अटकेत आहेत.
Goa Drug Case
खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर १४ फेब्रुवारी रोजी तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे पोलिसांनी ४९ ग्रॅम ड्रग्ज जप्त करून तिघांना पकडले होते. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला. यात तुळजापूर शहरातील अनेक बडे मासे जाळ्यात सापडले. माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक, अनेक राजकीय पक्षांचे पदाधिकाऱ्यांचे ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर पोलिसांवरील दबावही वाढला होता.
त्यानंतर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी तुळजापूर येथे भेट दिल्यानंतर हा विषय त्यांच्यासमोर आला. त्यावेळी पालकमंत्र्यांनी पोलिसांना या प्रकरणात कोणतीही हयगय न करता कारवाई करण्याचे आदेश दिले. आ. राणाजगजितसिंह पाटील यांनीही हा विषय उचलू धरला. तर खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी लोकसभेत हा विषय मांडून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली.
दरम्यान, पोलिस अधीक्षक जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार १४ जणांना अटक झाली असून, उर्वरित २१ जणांचा शोध सुरू आहे. या तपासातून समोर येत असलेली नावे व त्यांचा भूमिका निश्चित करून त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला जाणार आहे. मुंबईतील संगीता गोळे, संतोष खोत, युवराज दळवी, अमित अरगडे, संकेत अनिल शिंदे आदी अटकेत आहेत.