पणजी : पुढारी वृत्तसेवा
अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने बहुमत प्राप्त केले आहे. भाजपच्या या यशात अनेक नेत्यांचे योगदान आहे. त्यात भाजपचे संघटन मंत्री सतीश धोंड यांनी आखलेली राजनीतीचेही मोठे योगदान आहे. पश्चिम बंगालमध्ये 2017 मध्ये भाजपला अवघ्या तीन जागा मिळाल्या होत्या.
2021 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 77 जागा मिळाल्या होत्या. यावेळी झालेल्या निवडणुकीत भाजपने 194 जागा जिंकल्या आहेत. गोव्याचे सतीश धोंड हे गेली चार वर्षे पश्चिम बंगालमध्ये भाजप संघटनेची बांधणी करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन, केंद्रीय नेते आणि तेथील स्थानिक भाजप नेत्यांसह संघटन मंत्री म्हणून कार्यरत असलेले धोंड यांसारख्या अनेक नेत्यांच्या कामाचे फळ यावेळी भाजपला मिळाले आहे. सतीश धोंड हे पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडत आहेत.
धोंड यांनी स्थानिक भाजप नेत्यांना सोबत घेऊन गेली चार वर्षे पश्चिम बंगालमध्ये तळागाळात जाऊन सर्वसामान्य लोकांना भाजपचे काम सांगितले. लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविताना त्यांना भाजपकडे वळवले. त्याचा परिणाम म्हणून भाजपला सत्ता मिळाली आहे.
पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडली: धोंड
गेली चार वर्षे आपण पश्चिम बंगालमध्ये पक्षाचे कार्य करत आहे. पक्षाच्या नेत्यांनी जो आदेश दिला, त्यानुसार काम करताना स्थानिक नेत्यांना सोबत घेऊन पक्ष लोकांपर्यत पोचवण्याचे कार्य केले. पश्चिम बंगालमध्ये त्याचा परिणाम दिसून आला. भाजपला सत्ता मिळाली, ही आनंदाची बाब आहे. या विजयाबाबत भाजपचे राष्ट्रीय आणि राज्याचे नेते प्रतिक्रिया देतील, असे पश्चिम बंगालमधील भाजपचे संघटनमंत्री सतीश धोंड यांनी सांगितले.