goa News 
गोवा

Zuari River Dam Protest | ऐतिहासिक 'पांडवा बांधा'साठी सावर्डेकर आक्रमक; प्रस्तावित बंधाऱ्याच्या कामाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Zuari River Dam Protest | प्रस्तावित मीराबाग बंधाऱ्याचा बसणार फटका: पांडवांनी उभारणी केल्याची आख्यायिका

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

सावर्डे येथील मीराबाग परिसरात झुआरी नदीतील 'पांडवा बांध' हा गोव्याच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाचा एक महत्त्वाचा ठेवा मानला जातो. शेकडो वर्षांपासून पुराच्या पाण्याचा मारा सहन करत नदीच्या पात्रात तग धरून असलेल्या या बंधाऱ्याशी स्थानिकांची श्रद्धा जोडलेली आहे. आख्यायिकेप्रमाणे वनवास काळात पांडवांनी या बंधाऱ्याची उभारणी केली होती.

सावर्डेला कुडचडेशी जोडू शकणारा या बंधाऱ्याला धार्मिक महत्त्व प्राप्त असून, त्या ऐतिहासिक वारसाकडे दुर्लक्ष करत बंधारा उभारून त्या पांडवकालीन बंधाऱ्याचे अस्तित्व धोक्यात आणले जात आहे. जुआरी नदीवर उभारल्या जाणाऱ्या त्या प्रस्तावित बंधाऱ्याच्या विषयावरून गेल्या दीड वर्षांपासून वाद सुरू आहे.

नदीवर बंधारा बांधल्यास नदीकाठची घरे आणि बागायतीला धोका संभवतो. तसेच पुराच्या पाण्याला वाट न मिळाल्यास कुडचडे आणि सावर्डे मतदारसंघासह सांगे मतदारसंघाच्या नदी काठी वसलेल्या लोकवस्तीत पाणी शिरू शकते अशी भीती व्यक्त करून लोकांनी सदर बंधाऱ्याच्या विरोधात आंदोलन छेडले आहे.

रविवारी नदीच्या काठावर खास सभा घेऊन ग्रामस्थांनी हे काम थांबवण्याचे आवाहन कंत्राटदराला केले होते. पण त्याकडे दुर्लक्ष करून कामाला सुरुवात करण्यात आल्यामुळे सोमवारी वाद भडकला. व कंत्राटदाराला सर्व यंत्रे तेथून बाहेर काढावी लागली, हा प्रकल्प मागे घेतल्याचे सरकारकडून जाहीर केले.

जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. बंधाऱ्याच्या विषयावर सुरू असलेल्या वादाला आता पांडवकालीन बंधाऱ्यामुळे वेगळेच वळण मिळाले आहे. या प्रस्तावित प्रकल्पापासून अवघ्याच काही मीटर अंतरावर पांडवकाली बंधारा आहे.

आख्यायिकेनुसार, वनवास काळाच पांडवांनी या बंधाऱ्याची उभारणी केली होती. पाषाणी दगड रचून तयार करण्यात आलेल्या या बंधाऱ्याचा वापर त्याकाळी नदी ओलांडण्यासाठी केला जात होता असे मानले जाते.

सावर्डेला आणि कुडचडेशी जोडणाऱ्या या प्राचीन बंधाऱ्याला पांडवा बांध असेही संबोधले जाते. त्याकाळी आताच्या प्रमाणे कोणत्याही आधुनिक सुविधा उपलब्ध नव्हत्या. तरीही पारंपरिक पद्धतीने उभारलेला हा बंधारा शेकडो वर्षांपासून सुस्थितीत आहे.

बंधारा आजही सुस्थितीत...

मीराबागचे ग्रामस्थ सुमित नाईक म्हणाले, पांडवकालीन बंधारा आजही सुस्थितीत आहे. आख्यायिकेप्रमाणे वनवास भोगत असलेल्या पांडवांना सूर्योदयापूर्वी एकाच ठिकाणी राहता येत नव्हते.

त्यामुळे बांध पूर्ण होण्यास अवघेच काही अंतर शिल्लक राहिलेले असताना त्यांना तो बांध अर्धवट अवस्थेत सोडून द्यावा लागला होता. ओहोटीच्या वेळी तो बांध काही प्रमाणात पाण्यातून वर येत असल्याचे नाईक म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT