पणजी (विठ्ठल गावडे पारवाडकर):
तिसवाडी तालुक्यातील सांताक्रूझ मतदारसंघात सर्वच राजकीय पक्षांत इच्छुक उमेदवार वाढले आहेत. त्यामुळे सत्ताधारी भाजपसह काँग्रेस व अन्य पक्षातील पदाधिकारी उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत.
सांताक्रूझ मतदारसंघात २०२२ च्या निवडणुकीत काँग्रेसचे रुडॉल्फ फर्नांडिस निवडून आले होते. मात्र, त्यानंतर अन्य सात आमदारांसोबत ते भारतीय जनता पक्षात दाखल झाले. ते भाजपमध्ये चांगले रुळले आहेत. गेल्या साडेतीन वर्षांत भाजप सरकारच्या साहाय्याने भरीव अशी कामेही केली आहेत.
ते भाजप आमदार असल्याने भाजप उमेदवारीचे प्रमुख दावेदार असतानाच भाजपचे उमेदवार माजी आमदार टोनी फर्नांडिस हेही आपने उमेदवारी दिली, तर लढणार असे सांगत आहेत. तसेच भाजपचे माजी जिल्हा पंचायत सदस्य गिरीश उसकिकर यांनीही दावा सांगितला आहे.
भाजपने बाबूश मोन्सेरत यांना सांताक्रूझमधून उमेदवारी दिली, तर रुडॉल्फ फर्नांडिस यांना अपक्ष उभे राहावे लागेल. काँग्रेसमध्येही अनेक दावेदार निर्माण झाले आहेत. आम आदमी पक्षाचे राज्य संयोजक ॲड. अमित पालकर यांनी काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
ते सांताक्रूझचे काँग्रेसचे उमेदवार असू शकतात. २०२२ मध्ये त्यांनी सांताक्रूझमधून आपच्या उमेदवारीवर निवडणूक लढवली होती. पंचायत सदस्य शयनी ओलिह्वेरा व त्यांच्या मातोश्री सांताक्रूझच्या सरपंच जेनिफर ओलिह्वेरा यांनीही काँग्रेस उमेदवारीवर दावा केलेला आहे. अन्य काही नेतेही काँग्रेस उमेदवारीचे दावेदार असून निवडणूक लढवणार आहेत.
रुडॉल्फ फर्नांडिस (काँग्रेस): ८,८४९ मते
टोनी फर्नांडिस (भाजप): ६,३७७ मते
ॲड. अमित पालकर (आप): ४,०९८ मते
अजय खोलकर (आरजीपी): २,४१९ मते
व्हिक्टर गोन्साल्विसेस (तृणमूल): ५२३ मते
सांताक्रूझ मतदारसंघात पूर्वी व्हिक्टोरिया ऊर्फ मामी फर्नांडिस या सहजपणे निवडून आल्या होत्या. त्यांनी चारवेळा निवडणूक जिंकली होती. मात्र, त्यानंतर आमदार म्हणून निवडून आलेले ते एकाच टर्मचे आमदार ठरले आहेत. दुसऱ्यांदा मतदारसंघाने त्यांना संधी दिलेली नाही. त्यामुळे मामीचा पराक्रम अबाधित राहिला आहे.