फोंडा : राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार हे ‘अंत्योदय‘ तत्त्वावर चालत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अच्छे दिन’ खर्या अर्थाने साकारले असल्याचे उद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले. फोंड्यातील राजीव गांधी कला मंदिरात आज झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.
केंद्रात भाजप सरकारला अकरा वर्षे पूर्ण झाल्यामुळे ‘संकल्प से सिद्धी’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांसमवेत केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, कृषीमंत्री रवी नाईक, सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, सभापती रमेश तवडकर, मत्स्योद्योग मंत्री नीळकंठ हळर्णकर, कला संस्कृतीमंत्री गोविंद गावडे, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात, समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई तसेच मुख्य सचिव कांडावेलू उपस्थित होते.
मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, भाजप सरकार हे युवा शक्ती, नारी शक्ती, किसान आणि गरीब कल्याण अशा चार सूत्रींवर चालते. सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सरकारच्या योजना पोचवताना ‘सबका साथ, सबका विकास’ हे ध्येय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धरले आणि त्यानुसार काम केले म्हणून आज ‘अच्छे दिन’ संकल्पना मूर्तरुपात आली आहे. महिलांना आत्मनिर्भर बनवताना राज्यात किमान सतरा हजार महिलांना लखपती दीदी करण्याचा संकल्प सरकारने केल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक म्हणाले, सर्वसामान्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भाजप सरकार वावरत आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोचताना सर्वसामान्य माणसाला स्वयंभू करण्याचा संकल्प सरकारने केला असून, तो विकसित भारताच्या माध्यमातून पूर्ण होताना दिसत आहे. स्वागत सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी सूत्रसंचालन गोविंद भगत, रूपा च्यारी यांनी केले. कांदावेलू यांनी आभार मानले.
समाजातील गरजूंना हात देऊन त्यांना स्वयंपूर्ण करणार्या योजना विविध लाभार्थीना वितरित करण्यात आल्या. या योजना व्यवस्थितपणे पोचत्या करणार्या सरकारी अधिकारी कर्मचार्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. पेडणे आणि निरंकाल अशा दोन ठिकाणी वास्तव्य करून असलेल्या वानरमारी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारच्या विविध सोयीसुविधा देण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. या कार्यक्रमात वानरमारी समाजातील दोघाजणांना पेन्शन सुविधा दोघा जणांना ज्येष्ठ नागरिक कार्ड वितरित करण्यात आली.