पणजी (पुढारी वृत्तसेवा):
पहिल्याच प्रयत्नात आमदार झाल्यानंतर मंत्रीपद मिळणे हे आपले भाग्य आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेशध्यक्ष दामू नाईक आणि पक्षाच्या नेत्यांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरेल. कमी कालावधी मिळाला असला तरी अधिकाधिक चांगले काम करून कृषी, नागरी पुरवठा आणि हस्तकला या महत्त्वाच्या खात्यांना न्याय देईन, अशी प्रतिक्रिया मंत्री संकल्प आमोनकर यांनी व्यक्त केली.
गुरुवारी पर्वरी येथील मंत्रालयात आमोनकर यांनी आपल्या दालनाचा ताबा घेतला. माजी कृषीमंत्री रवी नाईक यांना देण्यात आलेले दालन आमोनकर यांना देण्यात आले आहे. ताबा घेतल्यानंतर त्यांनी रवी नाईक यांना आदरांजली वाहिली.
मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर गेल्या तीन दिवसांत तिन्ही खात्यांच्या मुख्यालयांना भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती घेतली. खात्यांमधील प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्यावर आपला भर राहील, असे आमोनकर यांनी सांगितले.
कृषी खात्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणारी नुकसानभरपाई वाढवून देण्याचा प्रयत्न करून, खात्याच्या योजनांचा लाभ प्रत्येक शेतकऱ्याला मिळावा यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे ते म्हणाले.
नागरी पुरवठा खात्याच्या उज्ज्वला योजनेचे प्रलंबित अर्ज येत्या पंधरा दिवसांत निकाली काढण्यात येतील. काही घरामधून एकाच गॅस जोडणीसाठी दोन ते तीन अर्ज आल्याने काही अर्ज प्रलंबित असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी वडील पद्मनाभ आमोनकर, आई रेखा आमोनकर, पत्नी नगरसेविका श्रद्धा आमोनकर, दोन्ही मुले आणि काका उपस्थित होते.