Mormugao Port Coal Pollution Pudhari File Photo
गोवा

Vasco Air Quality | कोळसा प्रदूषणावर आतापर्यंत कोणते उपाय केलेत?

Vasco Air Quality | २४ तासांत माहिती द्या; नागरिकांसह आ. आमोणकरांचा अदानी कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब

पुढारी वृत्तसेवा

वास्को : पुढारी वृत्तसेवा

कोळसा दुर्गंधी व प्रदूषण बंद करण्यासाठी यापूर्वी काय केले होते, भविष्यात कोणती सुधारणात्मक पावले उचलण्यात येतील, यासंबंधीची माहिती २४ तासांत लेखी स्वरुपात देण्याची मागणी मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी केली. ती मुरगाव बंदरातील कोळसा हाताळणी करणाऱ्या अदानी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मान्य केली.

प्रदूषणाच्या समस्या सुटेपर्यंत सदर हाताळणी कंपनी व मुरगाव बंदर प्राधिकरणाविरोधात लढा चालूच राहील, असा इशारा आमोणकर यांनी दिला. कोळशाची दुर्गंधी कायमस्वरूपी बंद करा, इंडोनेशियातील दगडी कोळशाची आयात बंद करा, अशीही आमोणकर यांनी केली. मुरगाव बंदरातील कोळशापासून सुटणाऱ्या दुर्गंधीमुळे सडा, बोगदा, जेटी व इतर परिसरातील हजारो रहिवासी वैतागले आहेत.

याबाबत त्या कंपनीबद्दल संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी आमदार आमोणकर यांनी शेकडो रहिवाशांसह ११ फेब्रुवारी रोजी अदानी कंपनीच्या कार्यालयासमोर मोर्चा नेला होता. याप्रसंगी तीन दिवसांत दुर्गंधी बंद न झाल्यास रहिवासी कार्यालयात शिरून पुढील कारवाई करतील, असा इशारा दिला होता. त्यानंतर तीन दिवसांत दुर्गंधीचा प्रादुर्भाव कमी झाला होता. तथापि कालपासून (दि. १६) पुन्हा दुर्गंधीने उचल खाल्ली आहे.

त्यामुळे आमदार आमोणकर यांच्यासह काही मोजक्या नागरिकांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने मंगळवारी (दि. १७) पुन्हा अदानी कंपनी कार्यालय गाठले. यावेळी कंपनीचे मुख्य अधिकारी संदीप व भूषण हे चर्चेसाठी बाहेर आल्यावर तेथे गरमागरम चर्चा झाली.

याप्रसंगी नगरसेविका श्रध्दा आमोणकर, रवींद्र भवन अध्यक्ष जयंत जाधव, उपाध्यक्ष डॉ. धर्मेंद्र प्रभूदेसाई, प्रसाद प्रभूगावकर, मुरगाव मतदार संघाचे प्रभारी संतोष केरकर, शांताराम पराडकर, रवळनाथ पेडणेकर, सामाजिक कार्यकर्ते सुरेश नाईक, सांतान व इतर उपस्थित होते.

हाताळणी करण्यासाठी अद्याप डोम का उभारण्यात आला नाही? कोळशाच्या ढिगाऱ्यावर पाणी का शिंपडले जात नाही? उघड्यावर साठविण्यात आलेला कोळसा निर्धारित वेळेत का उचलला जात नाही?. दुर्गंधी का येते याचे कारण सांगा, आरोग्यावर परिणाम करणारा सदर दगडी कोळसा आम्हाला नकोच तसेच इतर प्रश्नही उपस्थित करण्यात आले. आमोणकर यांनीही कंपनीच्या एकंदर भूमिकेबद्दल संताप व्यक्त केला. दुर्गंधी कायमी स्वरुपी बंद करावी तसेच सदर कोळसा लोकांच्या आरोग्यासाठी घातक असल्याने इंडोनेशियातील दगडी कोळशाची आयात करू नये.

या आमच्या मागण्या असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जर कोळसा प्रदूषणामुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत असेल, तर आम्हाला त्यांची काळजी आहे. कंपनीचे नुकसान होईल यांची फिकीर आम्हाला नसल्याचे आमोणकर यांनी स्पष्ट केले. आम्ही लोकांसाठी येथे उभे राहिलो आहोत. त्यामुळे कंपनीने योग्य तोडगा काढण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. याप्रकरणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी योग्य ते पावले उचलतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

समस्या सोडविण्याचा पूर्ण प्रयत्न

कंपनीचे अधिकारी संदीप यांनी सदर कोळसा आयात बंद करण्यासंबंधी आपण कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. ते व्यवस्थापनाचे काम असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी कंपनीतर्फे कोणत्या उपाययोजना केल्या यासंबंधी माहिती दिली.

उपाययोजनांमुळे दुर्गधी कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. कोळसा वाहतूक करण्यासाठी रेलगाड्या मिळत नसल्याने काहीवेळा कोळसा काही काळ पडून राहतो. यासंबंधी आम्ही सदर समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहोत, असे ते म्हणाले. त्यांनी कंपनीची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT