वास्को : पुढारी वृत्तसेवा
सांकवाळ पंचायत क्षेत्रातील जमिनीची वहन क्षमता किती आहे यासंबंधीचा अहवाल उपलब्ध झाल्याशिवाय नवीन मेगा हाऊसिंग प्रकल्पांना परवानगी देऊ नये, तसेच भविष्यात कलम ३९ (अ) अंतर्गत येणाऱ्या प्रकल्पांना पंचायतने कोणतीही मान्यता देऊ नये, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नारायण दत्ता नाईक यांनी रविवारी झालेल्या सांकवाळ ग्रामसभेत केली.
झुआरीनगर येथील एमईएस महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या ग्रामसभेत सांकवाळ पठारावरील तळ्याचे संवर्धन, झोपडपट्टी विकासासाठी घेतलेली कोमुनिदाद जमीन, कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, विविध कर, खेळाचे मैदान, वाहतूक व्यवस्था आदी विषयांवर चर्चा झाली.
काही वेळा वातावरण तापले असले तरी ग्रामसभेचे कामकाज पाहणारे पंच संतोष देसाई यांनी परिस्थिती योग्यरित्या हाताळली. या बैठकीला सरपंच अनुषा लमाणी, पंच संतोष देसाई, मारेलिओ कार्यालो, सचिव अमित तिळवे तसेच जिल्हा पंचायत सदस्य सुनील गावस उपस्थित होते.
ग्रामसभेत नाईक यांनी सांगितले की, पंचायत क्षेत्रातील विद्यमान रहिवाशांना आधी चांगल्या नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात त्यानंतरच मेगा प्रकल्पांचा विचार करावा. सध्याच्या रहिवाशांना पुरेशा सुविधा मिळत नसताना मेगा प्रकल्पांमुळे त्यांच्यावर अधिक ताण पडेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
त्यामुळे मेगा प्रकल्पांना बांधकाम परवाने देऊ नयेत तसेच पूर्ण झालेल्या प्रकल्पांना भोगवटा प्रमाणपत्र देऊ नये, अशी मागणी त्यांनी केली. यासंदर्भात ठराव घेण्याचीही सूचना त्यांनी केली. पंचायत क्षेत्रातील काही कंपन्या पंचायतीची परवानगी न घेता कार्यरत असून त्यामुळे पंचायतीचा महसूल बुडत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.
या प्रकरणाची तपासणी करून महसूल वसूल करावा, अशी मागणी त्यांनी केली. यावर सचिव अमित तिळवे यांनी सांगितले की काही प्रकरणांत कारवाईची प्रक्रिया सुरू झाली होती; मात्र संबंधितांनी न्यायालयात आव्हान दिल्याने अडथळे निर्माण झाले आहेत.
तथापि, संबंधित कंपन्यांकडून कर वसूल होईपर्यंत पुढील परवानग्या देऊ नयेत, असेही नाईक यांनी नमूद केले. पीटर डिसोजा यांनी परिसरातील भंगार अड्यांचा मुद्दाही उपस्थित केला. यापूर्वीच्या ग्रामसभेत या विषयावर चर्चा झाली होती; मात्र अपेक्षित कारवाई झालेली नाही, असा दावा त्यांनी केला.
यावर संतोष देसाई यांनी सांगितले की पंचायतने तीन भंगार अड्डे मालकांवर कारवाई करून ४५ हजार रुपये दंड वसूल केला आहे. इतरांच्या बाबतीत नाव व पत्ता सापडत नसल्याने अडचणी येत आहेत. तथापि, पंचायत कारवाई करत नसल्याने नवीन भंगार अड्डे वाढत असल्याचा आरोपही करण्यात आला. झुआरीनगर येथील एका शेतजमिनीत २०१७ मध्येच सुमारे ३५ भंगार अड्डे असल्याचे नारायण नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले.