Sal Gade Utsav 2026  
गोवा

Sal Gade Utsav 2026 | गडे उत्सवात फिरत्या व्यावसायिकांचा हिरमोड

Sal Gade Utsav 2026 | रस्त्यालगत उभारलेल्या काही दुकानांना वीज जोडणी नाकारली; विविध कारणास्तव निर्बंध

पुढारी वृत्तसेवा

साळ : पुढारी वृत्तसेवा

साळ येथील गडे उत्सवानिमित्त दरवर्षी दूरदूरवरून येणारे फिरते व्यावसायिक होळीपूर्वी तीन-चार दिवस आधी येऊन आपली दुकाने थाटतात आणि तीन रात्री व्यवसाय करतात. चंदाही अनेक फेरीवाले येथे येऊन आपली दुकाने उभी केली होती. मात्र, यावर्षी देवस्थान समितीने उत्सव सुरळीत पार पडावा यासाठी उपजिल्हाधिकारी व मामलेदार यांच्याकडे काही अटी व बंधने घालण्याबाबत अर्ज सादर केला होता.

त्या अनुषंगाने डिचोली उपजिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून खालचावाडा ते मधलावाडा परिसरातील रस्त्यालगत उभारलेल्या काही दुकानांना वीज जोडणी देऊ नये, असे निर्देश दिले. त्यामुळे या फिरत्या व्यावसायिकांना वीज कनेक्शन मिळू शकले नाही.

बीज खात्यानेही त्यांच्या दुकानांपर्यंत वीजपुरवठा केला नाही. इतकेच नव्हे, तर शेजारील घरांतूनही त्यांना वीज जोडणी मिळू शकली नाही.

परिणामी अनेक दुकाने बंद अवस्थेत दिसून आली. पूर्वी भाविकांची मोठी गर्दी होत असताना या दुकानांमुळे अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार होती. तसेच रोबंट येताना भाविक व दुकानदारांना त्रास होत असल्याने आणि काही वेळा व्यावसायिकांचे नुकसान होत असल्याच्या कारणास्तव हे निर्बंध घालण्यात आले होते.

मात्र, वाहतुकीस कोणताही अडथळा न करणाऱ्या काही दुकानांनाही वीज कनेक्शन नाकारण्यात आल्याने व्यावसायिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे अनेकांनी आपली दुकाने बंद ठेवून गडे उत्सव संपण्याची वाट पाहण्याचा निर्णय घेतला.

हे व्यावसायिक सहसा द्रवरून मालवाहू गाडीतून तीन-चार जण एकत्र येऊन साळ येथे पोहोचतात. उत्सव संपल्यानंतर त्याच गाड्या त्यांना परत घेण्यासाठी येतात. त्यामुळे एकेकटे निघण्याऐवजी सर्वजण दुकाने बंद करून गाड्यांची प्रतीक्षा करत असल्याचे चित्र दिसून आले.

तोडगा काढण्याची मागणी

तिसऱ्या रात्रीपर्यंत एकही जिन्नस विक्री न करता अनेकांनी आपला माल पुन्हा गाडीत भरून सकाळी माघारी प्रस्थान केले. काहीजण दुसऱ्या दिवशी, काही तिसऱ्या दिवशी, तर उरलेले चौथ्या दिवशी सकाळी निघून गेले. याप्रकरणी प्रशासनाने सर्वेक्षण करून भविष्यात योग्य तोडगा काढावा, अशी मागणी या व्यावसायिकांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT