गोवा; पुढारी वृत्तसेवा : गोव्यातील राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. पणजीतील भाजपच्या मुख्यालयात भाजपच्या गोवा प्रदेश कोर कमिटीची बैठक पार पडली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तानावडे हे माजी आमदार आहेत. सध्या विनय तेंडूलकर हे राज्यसभा खासदार आहेत. गोव्यातील राज्यसभेच्या जागेसाठी २४ जुलै रोजी निवडणूक होणार आहे.
पक्षाच्या बांधणीसाठी आणि एकूणच लोकसभा निवडणुकीसाठी काम करण्याचे नियोजन कोर कमिटीच्या बैठकीत झाले, अशी माहिती आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी दिली. बैठकीत लोकसभा व राज्यसभेच्या उमेदवारीबाबतही चर्चा झाली. उमेदवाराची घोषणा दिल्लीतून संसदीय समिती करणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
दरम्यान, गोव्यातील बरेच लोक पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांना विचारले असता, आपण सविस्तर आकडेवारी मागितल्याचे मुख्यमंत्र्यानी सांगितले. बैठकीला विधानसभा सभापती रमेश तवडकर उपस्थित.
हेही वाचा :