मयुरेश वाटवे
राष्ट्रीय वाहिन्यांवर दिल्लीच्या स्टुडिओत निवडणुकांचे निकाल दाखवताना किंवा निवडणूकपूर्व विश्लेषणात ‘इतर’ नावाचा एक कॉलम दाखवतात. भाजप, काँग्रेस आणि अलीकडे आम आदमी पार्टी एवढीच नावे राष्ट्रीय चर्चेत घेतली जातात. उरलेले महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, गोवा फॉरवर्ड आणि रिव्होल्यूशनरी गोवन्स हे ‘इतर’ मध्ये ढकलले जातात. पण खरे तर हेच ‘इतर’ पक्ष इथला निकाल ठरवतात. त्यांची ‘इतर’ म्हणून वासलात लावणे ही मोठी चूक असते.
आज काँग्रेस-आरजीची औपचारिक युती झाली आहे, गोवा फॉरवर्ड प्रतीक्षेत आहे आणि भाजप-मगो सरकार सत्तेत असूनही जागावाटपावरून त्यांच्यात ठिणग्या उडू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर या तिन्ही पक्षांचे महत्त्व समजून घ्यावे लागेल. रिव्होल्यूशनरी गोवन्स हा गोव्याबाहेर फारसा परिचित नसेल, पण गोव्यात त्याने कमी वेळात मोठी पकड बसवली आहे.
देशभरात सध्या स्थानिक भावनिक मुद्दे प्रभावी ठरत आहेत. गोवा अगोदरपासूनच त्याला अपवाद नाही. आरजीची सगळ्यात मोठी जमेची बाजू म्हणजे त्याचा थेट भूमिपुत्रवादाचा मुद्दा. नोकऱ्या, जमीन, पोगो बिल आणि परप्रांतीयांच्या लोंढ्याविरोधातील त्यांची आक्रमक भूमिका तरुणांना भावते.
सोशल मीडियावरील त्यांची ताकद इतर कोणत्याही गोव्यातील पक्षापेक्षा जास्त आहे. सांत आंद्रे, मये, शिवोली, मांद्रे या मतदारसंघांत त्यांचा लक्षणीय प्रभाव आहे. पण त्याची कमकुवत बाजू म्हणजे पक्षातील फुटीचा परिणाम संघटनात्मक विस्तारावर झाला आहे. वीरेश बोरकर यांच्या नेतृत्वाखालील गटाकडे काँग्रेसची युती आहे. ते विधिमंडळ पक्षप्रमुखही आहेत, पण त्यांच्या अस्तित्वालाच दुसऱ्या अधिक प्रबळ गटाने आव्हान दिले आहे.
अर्थात सध्या तरी कागदावर प्रबळ. प्रबळ कोण हे निवडणुकीतच ठरेल. हा दुसरा गट जमिनीवर सक्रिय आहे आणि तो पक्षाचे नुकसान करू शकतो. वीरेश बोरकर गटाने बारा जागांची मागणी केली आहे. त्यांना योग्य जागा मिळाल्या नाहीत तर ते काँग्रेसचे नुकसान करू शकतात.
दुसरा पक्ष म्हणजे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष. हा गोव्यातील सगळ्यात जुना प्रादेशिक पक्ष आहे. त्याची जमेची बाजू म्हणजे त्याचा पारंपरिक बहुजन आणि मराठी भाषिक मतदार. फोंडा, पेडणे, डिचोली, प्रियोळ या भागात आजही मगोला मानणारा निष्ठावंत वर्ग आहे. सत्तेच्या राजकारणात किंगमेकर म्हणून राहण्याचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे.
त्याची कमकुवत बाजू म्हणजे नेतृत्वाचा एकच चेहरा आणि नव्या पिढीशी तुटलेली नाळ. सुदिन ढवळीकर यांच्यावरच पक्ष अवलंबून आहे. पक्षाने सात जागांवर दावा सांगितला आहे. पण भाजप त्यांना किती जागा देऊ करतो हे पाहावे लागेल. पण युती तुटल्यास जवळपास १५ मतदारसंघांत तो भाजपला आपले उपद्रवमूल्य दाखवू शकतो.
तिसरा पक्ष गोवा फॉरवर्ड. विजय सरदेसाई यांच्या नेतृत्वाखालील या पक्षाची जमेची बाजू म्हणजे गोमंतकीय अस्मितेचा अजेंडा आणि अभ्यासू, आक्रमक नेतृत्व. जमीन, पर्यावरण आणि रोजगाराच्या मुद्द्यांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. फातोर्डा आणि सासष्टीतील काही भागात त्यांची पकड घट्ट आहे आणि २०१७ मध्ये त्यांनी किंगमेकर होऊन आपले वजन सिद्ध केले आहे.
त्याची कमकुवत बाजू म्हणजे भौगोलिक मर्यादा. ते प्रामुख्याने सासष्टीपुरतेच मर्यादित राहिले आहेत. दुसरे म्हणजे सत्तेसाठी तडजोड करणारा पक्ष असा शिक्का त्यांच्यावर बसला आहे. सध्या काँग्रेसशी बोलणी करण्याच्या ते प्रतीक्षेत आहेत, पण जास्त प्रतीक्षेने त्यांची सौदेबाजीची शक्ती कमी होऊ शकते.
या तिन्ही पक्षांना ‘इतर’ म्हणण्यात धोका काय आहे? गोव्यात बहुमत २१ जागांचे आहे आणि इथे निवडणूक हजार बाराशे मतांनी फिरते. गेल्या दोन निवडणुकांमध्ये मगो, गोवा फॉरवर्ड आणि आरजी यांनी प्रत्येकी १ ते ३ जागा जिंकल्या असल्या तरी १५ ते २० मतदारसंघांमध्ये प्रत्येकी ३ ते ५ हजार मते घेतली आहेत.
ही मते भाजप आणि काँग्रेसचीच होती. म्हणजे हे पक्ष जिंकले नाहीत तरी निकालावर प्रभाव टाकतात. त्यांना ‘इतर’ म्हटले की हे गणितच समजत नाही. म्हणूनच काँग्रेस-आरजी युती असो वा भाजप-मगो युतीतील धुसफूस असो, या तिन्ही पक्षांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आकाराने छोटे असले तरी गोव्याच्या राजकारणावर त्यांचा प्रभाव नाकारून चालणार नाही. राज्यात काही अनपेक्षित निकाल लागला तर तो याच ‘इतरां’मुळे लागतो हे लक्षात घ्यावे लागेल.