पणजी : पणजी महापौरपदी रोहित मोन्सेरात यांची सहाव्यांदा, तर उपमहापौरपदी वसंत आगशीकर यांची दुसऱ्यांदा सोमवारी बिनविरोध निवड झाली. मोन्सेरात यांनी सलग सहाव्यांदा महापौर बनण्याचा विक्रम केला. महापालिकेत अपूर्ण असलेल्या कामांना तसेच समस्यांना प्राधान्य तसेच दिलेली आश्वासने पूर्ण केली जातील, असे निवडीनंतर बोलताना त्यांनी सांगितले. यावेळी इतर नगरसेवकांनीही इंग्रजीतून आपल्या पदाची शपथ घेतली.
पणजी महापालिकेत सोमवारी घेण्यात आलेल्या विशेष बैठकीवेळी आयुक्त क्लेन मदेरा यांनी निवडणूक अधिकारी म्हणून भूमिका बजावताना दोन्ही पदांसाठी एकेकच अर्ज आल्याने बिनविरोध निवड जाहीर केली. नगरसेवकांची शपथ घेण्याची प्रक्रिया प्रभाग १ नुसार घेण्यात आली. महापौर व उपमहापौर निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नगरसेवक उदय मडकईकर म्हणाले की, रोहित मोन्सेरात यांनी सलग सहाव्यांदा महापौर होण्याचा मान मिळवून विक्रम केला आहे. निवडीनंतर रोहित मोन्सेरात म्हणाले, शहरातील पे पार्किंग तसेच वाहतूक कोंडी या समस्येवर तोडगा काढला जाईल. जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होईल, अशा कामांना महापालिका पाठिंबा देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी मंत्री बाबूश मोन्सेरात अनुपस्थित होते.
यावेळी निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्त क्लेन मदेरा यांनी पाच समित्या जाहीर केल्या. या समित्यांमध्ये एकाही विरोधी नगरसेवकाचा समावेश नाही.
विविध समित्यांतील सदस्य स्थायी समिती : रोहित मोन्सेरात, विठ्ठल चोपडेकर, रूपेश हळर्णकर, उदय मडकईकर, कबीर मखिजा व निकिता नाईक.
मार्केट व सार्वजनिक आरोग्य समिती: कॅरोलिन पो, अस्मिता केरकर, किशोर शास्त्री, विद्या गावकर, सिल्वेस्टर फर्नांडिस, कीर्ती साखळकर, सार्वजनिक बांधकाम समिती : शुभम चोडणकर, प्रसाद आमोणकर, करन पारेख, युतिका जांबावलीकर, वर्षा शेट्ये, तुकारम चित्रानवार, महिला व बाल कल्याण : करिना शिरोडकर, मार्गारिदा फनांडिस, दीक्षा माईणकर, विद्या गावकर, शायनी चोपडेकर. इस्पितळ समिती: बॅटो लोरेना, कृष्णा शिरोडकर व दीक्षा माईणकर.