Fungal Infection | धोका फंगल इन्फेक्शनचा 
गोवा

Goa Fungal Infection | राज्यात लहान मुलांमध्ये बुरशीजन्य संसर्गात वाढ

Goa Fungal Infection | 'इंडियन जर्नल ऑफ पेडियाट्रिक डर्मेटॉलॉजी'मधील अहवाल; उष्ण, दमट सागरी हवामानाचा परिणाम

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

राज्यात लहान मुलांमध्ये बुरशीजन्य संसर्ग (फंगल) त्वचेच्या विकारांमध्ये वाढ झाली आहे. उष्ण आणि दमट सागरी हवामानामुळे बुरशीजन्य त्वचेचे संक्रमण (फंगल) हे मुलांमध्ये सर्वात सामान्य त्वचारोग आहे. मुलांमधील त्वचेच्या बहुतांश आजारांपैकी निम्म्याहून अधिक रुग्ण संसर्गजन्य त्वचारोगाचे आहेत, असे एका अभ्यासात दिसून आले आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला 'इंडियन जर्नल ऑफ पेडियाट्रिक डर्मेटॉलॉजी'मध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात, गोवा मेडिकलच्या त्वचारोग विभागाच्या बाह्यरुग्ण विभागात आलेल्या, नवजात ते १४ वर्षे वयोगटातील ३०५ मुलांमधील त्वचेच्या विकारांचे विश्लेषण करण्यात आले.

संशोधकांच्या मते, लहान मुलांमधील त्वचेचे आजार प्रदेशानुसार वेगवेगळे आढळतात. राज्यामध्ये अलीकडील साथीच्या रोगासंबंधी माहितीचा अभाव असल्यामुळे हा अभ्यास हाती घेण्यात आला.

हवामान, स्वच्छता, सांस्कृतिक प्रथा आणि सामाजिक-आर्थिक परिस्थिती यांचा आजारांच्या स्वरूपावर लक्षणीय प्रभाव पडतो. ३०५ मुलांपैकी, १७९ (५८.७ टक्के) मुले आणि १२६ (४१.३ टक्के) मुली होत्या, तर सहा ते १४ वर्षांखालील वयोगटातील व्यक्ती अभ्यास गटाच्या ५६.४ टक्के होत्या.

बुरशीजन्य संसर्गाचा प्रकार सर्वाधिक

गोव्यात लहान मुलांमध्ये त्वचेचे आजार हे प्रमुख आहेत. ज्यामध्ये बुरशीजन्य संसर्गाचा प्रकार सर्वाधिक आहे. संशोधकांनी यावर जोर दिला की, अधिक जागरूकता, उत्तम स्वच्छता आणि वेळेवर उपचारांद्वारे यापैकी अनेक आजार टाळता येतात. तसेच, गोव्यातील विशिष्ट आजारांच्या स्वरूपाची नोंद केल्यास निदान सुधारण्यास, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा धोरणांना मार्गदर्शन करण्यास आणि लहान मुलांमधील त्वचेच्या आजारांचा भार कमी करण्यास मदत होऊ शकते, असेही संशोधकांचे मत आहे.

संसर्गजन्य त्वचारोगांची १६३ प्रकरणे नोंदवली गेली. अभ्यासात त्वचेचे विश्लेषण करण्यात आले. ३०५ मुलांमधील विकार, नवजात ते १४ वर्षे वयोगटातील विकार आहेत. गोवा वैद्यकीय महाविद्यालय बांबोळी येथे तपासलेल्या मुलांमध्ये बुरशीजन्य संसर्ग हा प्रमुख संसर्गजन्य आजार होता, ज्याची संख्या ८५ टक्के, म्हणजेच सर्व संसर्गजन्य त्वचारोगांच्या ५२.१ टक्के होती.

यात प्रादुर्भाव (३९ प्रकरणे; १९.०१ टक्के), जिवाणूजन्य संसर्ग (२८ प्रकरणे; १७.१८ टक्के) आणि विषाणूजन्य संसर्ग (१९ प्रकरणे; ११.६६ टक्के) होती. बुरशीजन्य विकारांमध्ये, पिटिरियासिस व्हर्सिकलर हा सर्वात सामान्य होता, जो बुरशीजन्य संसर्गाच्या ५५.३ टक्के होता, तर परजीवी संसर्गामध्ये खरुज ९०.३ टक्के होता. इम्पेटिगो हा प्रमुख जिवाणूजन्य संसर्ग होता आणि मोलस्कम काँटॅजिओसम हा सर्वात सामान्य विषाणूजन्य संसर्ग होता.

डॉ. तेजस सत्यवान नाईक, डॉ. तन्मय मदन काणे आणि त्वचारोग, वेनेरिओलॉजी विभागाचे डॉ. पंकज शुक्ला यांनी हे संशोधन केले. गोव्याचे उष्ण, दमट हवामान, बुरशीजन्य संसर्गाच्या संसर्गजन्य स्वरूपाबद्दलची कमी जागरूकता, वैयक्तिक आणि घरगुती वस्तूंची देवाण-घेवाण आणि उपचारांचे योग्य पालन न करणे, ही बुरशीजन्य संसर्गाच्या उच्च प्रादुर्भावाची कारणे आहेत.

अभ्यासात असे आढळून आले की, तीन ते चौदा वर्षांखालील मुलांमध्ये बुरशीजन्य संसर्ग सर्वात सामान्य होता, तर एक वर्षापेक्षा कमी वयाच्या अर्भकांमध्ये एक्झिमाचे प्रमाण अधिक होते. संसर्गजन्य आणि दाहक विकार अधिक वाढण्यापूर्वी, नवजात काळात शारीरिक त्वचेच्या समस्या सर्वात जास्त प्रमाणात दिसून आल्या.

गोव्याची इतर प्रदेशांशी तुलना करताना, संशोधकांनी सांगितले की गोवा आणि आंध्र प्रदेशसारख्या दमट किनारपट्टीच्या राज्यांमध्ये बुरशीजन्य संसर्ग अधिक सामान्य आहेत, तर उत्तरेकडील कोरड्या राज्यांमध्ये जिवाणूजन्य संसर्ग अधिक प्रचलित आहेत. त्यांनी असे सुचवले की, गोव्यातील तुलनेने कमी असलेला जिवाणूजन्य संसर्गाचा दर हा उच्च साक्षरता, उत्तम नागरी जीवनमान आणि सुधारित स्वच्छतेचे प्रतिबिंब असू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT