Revolutionary Govens Party 
गोवा

Revolutionary Govens Party | आरजी पक्षार राष्ट्रीय अध्यक्ष संकल्पनाच नाही

Revolutionary Govens Party | अजय खोलकर; १८ विधानसभा मतदारसंघ समित्यांची घोषणा; भाजपविरोधात लढाई सुरूच

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
पक्षाची घटना आणि निवडणूक आयोगाकडील पक्ष नोंदणीप्रमाणे राष्ट्रीय अध्यक्ष ही संकल्पना नाही. त्यामुळे आमचाच पक्ष हा खरा रिव्होल्युनरी गोवन्स पार्टी आहे. याच पक्षाच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहोत, असे रिव्होल्युनरी गोवन्स पार्टीचे पदाधिकारी अजय खोलकर यांनी सांगितले.

पाटो येथील पक्ष कार्यालयात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पक्षाचे उपाध्यक्ष सेबी फर्नांडिस, अनिश नाईक, गौरेश मांद्रेकर, रोहन कळंगुटकर उपस्थित होते. यावेळी त्यांनी पक्षाच्या अठरा मतदारसंघातील समित्यांची घोषणा केली. यात डिचोली, पेडणे, मांड्र्रे, वाळपई, थिवी, बाणावली, कुडतरी, कुंकळ्ळी, सांगे, साळगाव, सावर्डे, शिरोडा, मडकई, साताकुझ, शिवोली, हळदोणे, कळंगुट आणि प्रियोळ या मतदारसंघांचा समावेश आहे.

खोलकर म्हणाले की, गोमंतकीयांचा हक्क त्यांना मिळालाच पाहिजे. पूर्वी भाजप विरोधात जी लढाई सुरू होती, ती सुरूच ठेवून आगामी विधानसभा निवडणूक फुटबॉल चिन्हावरच लढवणार आहोत. यासाठी पूर्वी ज्या समित्या बरखास्त करण्यात आल्या होत्या, त्याच पुन्हा नव्याने तयार करण्यात आल्या आहेत.

काँग्रेसकडून गैरारजीशी चर्चा

आमदार वीरेश बोरकर यांच्या नेतृत्वाखालील आरजी आगामी निवडणुकीसाठी काँग्रेससोबत आघाडी करणार आहे. यावर आपले म्हणणे मांडताना खोलकर म्हणाले की, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर हे सध्या गैरारजीशी चर्चा करत आहेत. आम्हीही निवडणुकीसाठी राज्यभरात काम करत असून निवडणूक लढवणार हे निश्चित आहे.

सांत आंद्रे समिती कधी?

आरजीपीने आज जाहीर केलेल्या समित्यांमध्ये सांत आंद्रे मतदारसंघाचा समावेश नसल्याबद्दल विचारले असता खोलकर म्हणाले की, सांत आंद्रे मतदारसंघातही बैठक सुरू असून तिथेही समिती नियुक्त केली जाणार असून विधानसभा निवडणुकीसाठी तिथे आमचा उमेदवारही लढणार आहे. तर आरजीचे माजी अध्यक्ष मनोज परब पक्षात कधी परतणार असे विचारले असता ते म्हणाले, त्यांच्याशी बोलणी सुरू असून त्यांचा प्रतिसाद सकारात्मक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT